उत्तरप्रदेशात वारंवार जातीयवादाला खतपाणी घालणारी वक्तव्य करणारे वादग्रस्त भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे.
लखनऊ – उत्तरप्रदेशात वारंवार जातीयवादाला खतपाणी घालणारी वक्तव्य करणारे वादग्रस्त भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे.
बुधवारी रात्री लखनऊमध्ये बंदी आदेश झुगारुन निवडणूक सभा घेतल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गुरुवारी सकाळी प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला.
आदित्यनाथ यांच्यासह या सभेला उपस्थित असलेल्या पक्षाच्या अन्य नेत्यांविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशात होणा-या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये आदित्यनाथ यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा संभाळली आहे. लखनऊमधल्या सभेमध्ये आदित्यनाथ यांनी समाजदवादी पक्षाच्या सरकारवर जातीयवादी कार्यक्रम राबवत असल्याचा आरोप करत कडाडून टिका केली.
लखनऊ पूर्वचे भाजप उमेदवार आशुतोष टंडन गोपाळजी आणि अन्य नेत्यांच्या विरोधात आयपीसीच्या विविध कलमांखाली गाझीपूर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने आदित्यनाथ यांच्या संपूर्ण सभेचे चित्रीकरण केले असून, सभेची सीडी निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे.