किंग इन बॅड टाईम बनलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या युनायटेड स्पिरीट कंपनीचे ५० टक्क्याहून अधिक समभाग डियाजियो कंपनी विकत घेण्याची शक्यता आहे.
मुंबई – किंग इन बॅड टाईम बनलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या युनायटेड स्पिरीट कंपनीचे ५० टक्क्याहून अधिक समभाग डियाजियो कंपनी विकत घेण्याची शक्यता आहे. डियाजियो आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा मद्यनिर्मिती समूह आहे, तर युनायटेड स्पिरीट लिमिटेड भारतातील आघाडीची मद्यनिर्मिती कपंनी आहे.
किंगफिशर एअरलाईन्वर असणा-या हजारो कोटींच्या कर्जामुळे मल्ल्या यांच्यासमोर यूबी समूहातील समभागविकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीचा मद्यनिर्मिती समूह यूबी समूहात गुंतवणूक करणार असल्याची चर्चा आहे.
दोन्ही समूहातील हा व्यवहार अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. अधिग्रहणाच्या या बातमीने यूनायटेड स्पिरीटच्या गेल्या ५२ आठवडयांपासून कोसळणा-या शेअरमध्येही ६ टक्के वधारणा झाली आहे. हे अधिग्रहण झाल्यानंतर कंपनीतील व्यवस्थापन(मॅनेजमेंट) हक्क डियाजियोकडे असतील पण, कंपनीच्या चेअरमनपदी विजय मल्ल्या कायम रहणार आहेत. काही समभाग मल्ल्या आपल्याकडे ठेवणार आहेत. या अधिग्रहणामुळे मल्ल्या यांना हजारो कोटीचे कर्ज फेडून किंगफिशर एअरलाईन्सला पून्हा नव्याने उभे करता येणार आहे.
आर्थिक क्षमतेअभावी डिजीसीएने किंगफिशरचा हवाई परवाना निलंबित केला आहे. डियाजियोसाठी हा सौदा फायद्याचा ठरणार आहे. कारण यूबी ग्रुपची भारतीय बाजारपेठ त्यांच्या ताब्यात येणार आहे. या डीलमुळे डियाजियोला फ्रेंच स्पर्धक पनॉर्ड रिकार्डला मागे टाकता येणार आहे. पनॉर्ड रिकार्ड वेगाने भारतीय बाजारपेठे काबीज करत आहे. जॉनी वॉकर स्कॉच आणि स्मिरन ऑफ व्होडका हे डियाजियोचे सर्वाधिक लोकप्रिय असणारे ब्राण्ड आहेत.