अमेरिकन लष्कराच्या हालचाली पाहता उत्तर कोरियानेसुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे. दक्षिण कोरियाच्या सरकारी माध्यमांनी उत्तर कोरियातील शस्त्रास्त्र आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांवर एक अहवाल जारी केला. त्यानुसार, उत्तर कोरिया आपल्या प्रकल्पांचे हॅमहुंग या गुप्त शहरात स्थलांतरित करत आहे. या शहरातील विविध कारखान्यांमध्ये प्रॉडक्ट्सची नावे वेगवेगळी असली तरी प्रत्यक्षात तेथे युद्धाची साहित्ये बनवली जातात. अनेक कारखान्यांमध्ये क्षेपणास्त्र आणि आंतरखंडीय मिसाइलला लागणारे इंधन प्रोसेस केले जात आहे. त्यामुळे, शेजारील शत्रू राष्ट्र दक्षिण कोरियात ‘हॅमहुंग’ शहराची जोरदार चर्चा सुरू आहे.
उत्तर कोरियावर नजर ठेवणा-या दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकन संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, क्षेपणास्त्रांमध्ये प्रामुख्याने यूडीएमएच असे विशिष्ट प्रकारचे इंधन वापरले जाते. त्या इंधनाची प्रोसेसिंग हॅमह्युंग शहरात केली जात आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या याच शहरातून केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून या शहरात लष्करी हालचालींना वेग आला आहे. उत्तर कोरियातील हँगयोंग प्रांताची राजधानी हॅमह्युंंग उत्तर कोरियातील सर्वात मोठय़ा औद्योगिक शहरांपैकी एक आहे.
७.५ लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात मोठय़ा संख्येने कापड कारखाने आहेत.१९५० च्या दशकात झालेल्या कोरियन युद्धात अमेरिका आणि दक्षिण कोरियाने या शहरावर जोरदार हवाई हल्ले केले होते. त्या हल्ल्यांमध्ये शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. शहरातील ८० टक्के लोकांचा मृत्यू झाला होता. शहराची त्या वेळची अवस्था पाहून येथे पुन्हा नागरी वस्ती होईल असा कुणी विचारही केला नव्हता.
मात्र, युद्धानंतर या शहरातील जमिनीत दबलेले काळे सोने अर्थात कोळशाने शहराला पुन्हा सुगीचे दिवस आणले. १९९० च्या दशकात आलेल्या दुष्काळाने अनेक स्थानिकांनी शहरातून स्थलांतर केले. यानंतरही शहर पुन्हा सावरले. आज या शहरात टेक्सटाईल, मेटलवेअर, मशिनरी, ऑइल इंडस्ट्री आणि केमिकलसह असंख्य कारखाने आहेत. उत्तर कोरिया याच शहरातील कारखान्यांमध्ये गुप्तरीत्या रॉकेट फ्यूल आणि मिसाईल फ्यूल तयार करत आहे.