मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे.
मुंबई – मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे.
मेमनने सर्वोच्च न्यायलयात दाखल केलेला दयेचा अर्ज फेटाळल्यास त्याला ३० जुलै रोजी सकाळी सात वाजता नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात येईल. दरम्यान, याकूबच्या फाशीच्या शिक्षेची तयारी सुरु केल्याचे वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी सांगितले.
१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सुमारे २५० जण ठार झाले होते, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते. याकूब स्फोटाचा मास्टरमाईंड होता. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या मेमनला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी १९९४ मध्ये अटक झाली होती.
२००७मध्ये टाडा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. याकूबवर हल्ल्याचा कट रचणे, हल्ला करणे, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे यांसह विविध गुन्ह्यांतर्गत आरोप दाखल करण्यात आले. त्यानंतर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टाडा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.
न्यायालयाच्या या निर्णयावर मेमन याने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका दाखल केली होती. अखेर राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळून लावत मेननची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.