ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
बंगळूरु – ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत त्याने वनडेला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकदिवसीयमधून जरी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी मात्र तो कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिजच्या दौ-यावर जात आहे. त्यापूर्वीच हॅडिनने निवृत्ती जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलिया संघ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असताना मी निवृत्ती घेत आहे. आम्ही जे काही मिळवले त्याचा आम्हाला अभिमान आहे. तीन विश्वचषक स्पर्धेत मला सहभागी होता आले याचा मला आनंद आहे आणि एकदिवसीय क्रिकेटमधून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे असे हॅडिनने यावेळी सांगितले.
हॅडिन एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२६ सामने खेळला आहे. यात त्याने ३१.५३ च्या सरासरीने तीन हजार १२२ धावा केल्या आहेत. २००१ मध्ये होबार्ट येथे झिम्ब्वॉवेविरुद्धच्या सामन्यातून हॅडिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.