तुरुंगात असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी वाढ करण्यात आली.
हझारीबाग – झारखंड वीज मंडळाच्या अधिका-याला मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी वाढ करण्यात आली. त्यामुळे सिन्हा यांच्यासोबतच त्यांच्या समर्थकांना येत्या २८ जून पर्यंत कोठडीत रहावे लागणार आहे.
ज्येष्ठ न्यायदंडाधिकारी आर. बी. पाल यांनी सिन्हा यांच्या न्यायालयीन कोठडीत २८ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. सिन्हा यांनी जामीन घेण्यास नकार दिल्यानंतर स्थानिक न्यायालयाने हे आदेश दिले.
तीन जून रोजी झारखंड वीज मंडळाच्या अधिका-याला मारहाण केल्याप्रकरणी सिन्हा तसेच अन्य ५४ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. जेएसईबीच्या हजारीबाग शाखेचे व्यवस्थापक धानेश झा यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सोमवारी यशवंत सिन्हा आणि ५४ जणांना अटक झाली होती. अनियमित वीज पुरवठया विरोधात आंदोलन करणा-या भाजप कार्यकर्त्यांनी आपले हात-पाय बांधण्याचा प्रयत्न केला असे झा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.