म्हाडा प्राधिकरणाची गुरुवार, १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई – म्हाडा प्राधिकरणाची गुरुवार, १९ डिसेंबर रोजी नागपूर येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. गेल्या दोन बैठकीतील प्रलंबित विषयांसह काही महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील मौजे बाळे-सोरेगाव येथील २४५.४४१ चौरस मीटर जमीन खरेदीचा प्रस्ताव आहे. या जमिनीचा दर १५३ कोटी रुपये सांगण्यात आला आहे. या प्रस्तावावर गेल्या बैठकीत चर्चा झाली नसल्याने या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच सांताक्रूझ परिसरातील कोले-कल्याण येथील भूखंडावर भागीदारीत (जॉइंट व्हेंचर ) प्रकल्प राबवण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. मागील बैठकीत घरांच्या किमतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार होता. मात्र काही कारणास्तव तो झाला नाही. त्यामुळे या बैठकीत हा विषय अजेंडय़ावर होता. मात्र त्याबाबतचा सविस्तर तपशील संकलन करण्यात आला नसल्याने हा विषय या बैठकीत होणार नसल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, आयत्या वेळी येणा-या विषयांमध्ये मोतीलाल नगरचा पुनर्विकास, तसेच संक्रमण शिबिरातील घुसखोरांबाबतचा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसेच म्हाडाला मिळणारा १८९ कोटी रुपयांचा विशेष निधी कोणत्या कामासाठी वापरता येईल, याबाबतही ठरवले जाणार आहे. एकूण १० ते १२ विषय असणार आहेत. अधिवेशन नागपूर येथे असल्याने ही बैठक नागपूरमध्येच आयोजित करण्यात आली आहे. बैठकीसाठी मुंबईतून म्हाडाचे संबंधित अधिकारी नागपूरला रवाना झाले आहेत. त्यामुळे नियोजित बैठक ठरलेल्या वेळेत सुरू होईल, असे सांगण्यात आले.