दक्षिण मुंबईतील मोक्याच्या जागेतली घरे म्हाडाने अधिका-यांच्या वसाहतीसाठी राखून ठेवल्यामुळे या घरांची सोडतीद्वारे होणारी विक्री रखडली आहे.
मुंबई – दक्षिण मुंबईतील मोक्याच्या जागेतली घरे म्हाडाने अधिका-यांच्या वसाहतीसाठी राखून ठेवल्यामुळे या घरांची सोडतीद्वारे होणारी विक्री रखडली आहे. मलबार हिल, वरळी सीफेस, दादर, माहीम अशा उच्चभ्रू वसाहतींत म्हाडाला पुनर्विकासातून ५१ घरे मिळाली आहेत. ८०० ते १ हजार चौरस फुटांच्या या आलिशान घरांची विक्री करण्याऐवजी ती अधिका-यांच्या क्वार्टर्ससाठी वापरण्याचा निर्णय म्हाडाने घेतल्याचे एका अधिका-याने सांगितले.
जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये खासगी विकासकांकडून ना हरकत प्रमाणपत्रांच्या बदल्यात म्हाडाला ही प्रशस्त घरे मिळाली आहेत. खासगी विकासकांकडून ना हरकत प्रमाणपत्रांचे पैसे घेण्याऐवजी त्या बदल्यात घरे घेण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. जुन्या इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर तेथील घरे रहिवाशांना दिली जातात. त्यातून उरलेली घरे म्हाडा मास्टरलिस्टमधील रहिवाशांना देते. मात्र मास्टरलिस्टमधील रहिवाशांना ६८० चौरस फुटांपेक्षा मोठे घर न देण्याचा ठराव म्हाडाने केला होता. त्यामुळे अशा प्रकारची मोठी घरे मुंबई मंडळाकडे हस्तांतरित करून ती सोडतीद्वारे रहिवाशांना विकण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. या घरांच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला देण्यात यावे, कारण त्यामुळे या मंडळाची रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, असाही उद्देश होता. मात्र, हा उद्देश बाजूला ठेवून ही आलिशान घरे म्हाडाने अधिका-यांच्या क्वार्टर्ससाठी ठेवली असल्याचे माहीतगारांकडून सांगण्यात आले.