झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी म्हाडा अद्याप सव्र्हेअर नियुक्तीच्याच फे-यात अडकल्याने म्हाडाची ही ‘झोपु’ योजना सुरुवातीलाच झोपल्याचे चित्र आहे.
मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी म्हाडा अद्याप सव्र्हेअर नियुक्तीच्याच फे-यात अडकल्याने म्हाडाची ही ‘झोपु’ योजना सुरुवातीलाच झोपल्याचे चित्र आहे. योजनेच्या सुरुवातीच्या प्रक्रियेसाठी म्हाडाने काढलेल्या सव्र्हेअरच्या निविदांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने आता या नियुक्तीसाठी मार्च २०१४पर्यंत तब्बल तीन महिन्यांची मुदत वाढवली आहे. त्यामुळे सुरुवातीलाच थंड प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाच्या या झोपू योजना प्रक्रियेचा वेग मंदावला आहे.
म्हाडाच्या जवळपास ८६ मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. आतापर्यंत झोपडपट्टी पुनर्वसन योजना एसआरएकडून राबवण्यात येत होती. मात्र जास्तीच जास्त घरे उपलब्ध करण्यासाठी म्हाडाने ही योजना स्वत:च राबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केल्यावर म्हाडाने या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे ठरवले. झोपु योजना राबवण्यापूर्वी सुरुवातीच्या प्रक्रियेसाठी सव्र्हेअर नियुक्ती करण्याचे म्हाडाने ठरवले.
अतिक्रमित झोपडपट्टीचे सीमांकन करणे, स्टेशन सव्र्हे करणे, झोपडपट्टीच्या आजूबाजूस म्हाडाच्या मालकीच्या जमिनींचा तपशील उपलब्ध करणे, अतिक्रमित झोपडय़ांचा तपशील उपलब्ध करणे, अतिक्रमित झोपडपट्टीवरील विकास आरक्षणाविषयी माहिती उपलब्ध करणे, अतिक्रमित झोपडय़ांचा तपशील परिशिष्ट-२ जारी करण्यासाठी आवश्यक दस्त तयार करणे, भूमापन नकाशे व मालमत्ताकर पत्रक उपलब्ध करणे याकरता अधिकृत सव्र्हेअरसाठी म्हाडाने अर्ज मागवले होते.
एकदा मुदत वाढवूनही मुदतीनंतर फक्त आठच अर्ज म्हाडाकडे आले. ३० ते ४० अर्ज आल्यास त्यातून आठ ते १० सव्र्हेअरची नियुक्ती म्हाडाला करता येईल. मात्र निविदांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा मुदत वाढवत बसण्यापेक्षा आता एकदाच वाढवावी, असा निर्णय म्हाडाने घेतला. त्यामुळे आता सव्र्हेअर नियुक्तीच्या अर्जासाठी मार्च २०१४पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सव्र्हेअर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच या योजनेला गती येईल, असे एका अधिका-याने सांगितले.