आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
इस्लामाबाद – दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदेनी दाऊद पाकिस्तानात असल्याचे म्हटले होते. दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिले आहेत. तरीही दाऊन पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा येथील परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
‘आम्ही पुन्हा एकदा सांगत आहोत की दाऊद पाकिस्तानात नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तसनीम अस्लम यांनी सांगितले. याआधीही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. आम्ही संपूर्ण तपासानंतरच दाऊद पाकिस्तानात नसल्याचा दावा आम्ही करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम याच्या अटकेसाठी केंद्र सरकारतर्फे जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. अमेरिकेच्या ‘एफबीआय’च्या मदतीने दाऊदला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी दिली होती.
१९९३मधील मुंबई बॉस्फोट मालिकेसह अनेक गुन्हयात भारताला हवा असलेल्या दाऊद इब्राहिमला ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकार अमेरिकेतील एफबीआयच्या संपर्कात आहे. कराची शहरात अनेकदा दाऊदचे वास्तव्य असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे, असेही सुशीलकुमार शिंदेंनी सांगितले होते. मात्र पाकिस्तान सरकार हा दावा फेटाळत आहे.