आठवडयाभराचा क्षीण घालवण्यासाठी आठवडयाच्या अखेरीस प्रेक्षकांना चांगले चित्रपट, व्याख्यानमाला आणि संगीत संध्या सारख्या कार्यक्रमाची अपेक्षा असते. या आठवडयात शुक्रवार ते रविवारी मुंबईत विविध ठिकाणी प्रेक्षकांसाठी असे खास कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी व्याख्यानमाला, संगीत मैफीली आणि चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत.
कृतार्थ मुलाखतमाला
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन, माधवबाग आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृतार्थ मुलाखतमाले’च्या दुस-या पर्वाला सुरुवात होणार आहे. या मुलाखतमालेत ज्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे, तसंच जे अजूनही कार्यरत आहेत, आणि प्रसिद्धीपासून लांब असलेल्या व्यक्तीशी संवाद साधला जातो. या पर्वात ‘लागू बंधू मोतीवाले’ पेढीचे प्रमुख श्रीकांत लागू यांची मुलाखत पत्रकार शुभदा चौकर घेणार आहेत. श्रीकांत लागू यांचे मोती आणि दागिने या विषयांबरोबरच क्रीडा, नाटय़, भटकंती आणि गिरिभ्रमण हे प्रमुख छंद आहेत. या पर्वाचा शुभारंभ श्रीकांत लागू यांच्याच हस्ते होणार आहे.
’स्थळ : दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, माटुंगा
’वेळ : सायं. ६
म्युझिक अॅण्ड हि-दम मास्टर्स
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ऐतिहासिक कॉन्सर्टचा अनुभव मुंबईकरांना मिळणार आहे. पंचम निषाद आयोजित या कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. या सोहळ्याच्या पहिल्या सत्रात तबला नवाझ उस्ताद झाकिर हुसेन आपल्या अदाकारी सादर करतील. त्याचबरोबर आघाडीचे दिग्गज गायक रशिद खान हे आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील, तर दुस-या सत्रात झाकिर हुसेन आणि प्रख्यात सतारवादक बुद्धादित्य मुखर्जी एकत्रित कला सादर करतील. झाकिर हुसेन आणि रशिद खान हे एकमेवाद्वितीय कलाकार पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर एकत्रित कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाची तिकिटं ऱ्हिदम हाऊस (फोर्ट), महाराष्ट्र वॉच कंपनी (दादर) या ठिकाणी मिळतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : २४१२४७५०/२४१८८४९४
’स्थळ : शिवस्वामी ऑडिटोरिअम, फाइन आर्ट्स, चेंबूर, ’वेळ : सायं. ७
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार्याने तिसरा यशवंत आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत सुरू होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टी आणि यशवंतराव चव्हाण यांचं हे शताब्दी वर्ष आहे. दरवर्षी होणारा हा महोत्सव यंदा १९ ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होईल. या फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांचा गौरव करण्यात येणार आहे. चित्रपट महोत्सवात एकूण ११२ चित्रपट दाखवण्यात येणार असून त्यापैकी ५० देशांतील ४६ चित्रपट, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या २३ शॉर्ट फिल्म्स आणि चालू वर्षातील ४ बहुचर्चित मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यात ‘बालक पालक’, ‘संहिता आणि तुझा धर्म कोणता?’ आणि ‘पुणे ५२’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालियामर्दन’ अशा अनेक दुर्मीळ चित्रपटांची पुनस्र्थापना करून तेदेखील या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क : २२०२८५९८ / २२०४५४६०
’स्थळ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉइंट, चर्चगेट.
’वेळ : सायं.
संस्कृत व्याकरण कार्यशाळा
अश्वमेघ फाउंडेशन, दादर यांच्यातर्फे मार्च महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत व्याकरण कार्यशाळा आयोजित केली जाते. यंदा ही कार्यशाळा रविवार, २० जानेवारीला होणार आहे. या कार्यशाळेत परीक्षेसाठी आवश्यक व्याकरण, लेखन विकास यात अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी मार्गदर्शन, परीक्षा तंत्र आदी महत्त्वाच्या बाबींवर अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाईल.
अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी : २४३३१६२२ किंवा ९९२०२२९५५५
’स्थळ : शारदाश्रम विद्यामंदिर, दादर
’वेळ : सकाळी १० ते सायं. श्
व्ही.एन.देशपांडे स्मृती समारोह
पंडित. व्ही. एन. भातखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘व्ही.एन.देशपांडे स्मृती समारोह’ भरत आहे. या संगीत कार्यक्रमात सकाळी साडेनऊच्या सत्रात डागर घरण्याचेउदय भवाळकर ध्रृपदगायन सादर करतील. सकाळच्या सत्राची सांगता जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रतिमा टिळक यांच्या ख्याल गायकीने होईल. कार्यक्रमातील संध्याकाळच्या सत्राची सुरुवात मिताली भौमिक (पतियाळा घराणं) यांच्या ख्याल गायनाने होईल. त्यानंतर शरद साठे ख्याल नुमा (ग्वाल्हेर घराणं) सादर करतील. शुभा जोशी (भेंडीबाजार घराणं) यांच्या ठुमरी गायनाने संगीत समारोह कार्यक्रमाची सांगता होईल. महोत्सवात गायकांची रूपक कुलकर्णी (बासरी वादक) साथसंगीत करतील. संपर्क : २४३०४१५०
’स्थळ : दादर माटुंगा कल्चरल सेंटर, स्टारसिटी माटुंगा रोड, बॉम्बे ग्लासवर्क समोर, यशवंत नाटयगृहाशेजारी, माटुंगा.
’वेळ : सकाळी ९.३० आणि संध्याकाळी ५.००
खगोलीय भौतिकीवर व्याख्यान
वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये खगोल भौतिकीवर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानाचा विषय -‘अतिदिप्त नवताऱ्यातून होणारे किरणोत्सर्ग : नवीन शोधाची कथा’ असा आहे. या विषयावर यू.एस.च्या हावर्ड विद्यापीठाचे व्याख्याते डॉ. सयन चक्रबर्ती बोलणार आहेत.
’स्थळ : हॉल ऑफ कल्चर, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, वरळी
’वेळ : संध्याकाळी ५
विष्णूशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमाला
दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनारायण रुईया महाविद्यालयातर्फे २३, २४, २५ जानेवारी २०१३ ला विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमाला होणार आहे. व्याख्यानमालेचं यंदाचं चाळीसावं र्वष आहे. व्याख्यानमालेचा विषय ‘चित्रपटसृष्टीची शंभर र्वष’ आहे. २३ जानेवारी रोजी होणा-या व्याख्यानमालेचा विषय ‘हरिश्चंद्राची फॅक्टरीच्या निमित्ताने..’ असा असून व्याख्यानाचे वक्ते नंदू माधव आहेत. ‘चित्रपटसृष्टीतील समांतर प्रवाह’ हा २४ जानेवारीच्या व्याख्यानमालेचा विषय असून यावर गणेश मतकरींचे विचार ऐकता येतील. व्याखानमालेच्या शेवटच्या दिवशी अरुण खोपकर ‘न दिसणारा सिनेमा’ या विषयावर विचार मंथन करतील.
’स्थळ : रामनारायण रुईया महाविद्यालय, लखमसी नप्पू रोड, माटुंगा. ’वेळ : संध्याकळी ६.३०
स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला
जुहूच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने स्वामी विवेकानंदांच्या शकतोत्तर सुवर्णजयंतीच्या निमित्ताने १३ जानेवारीपासून ‘स्वामी विवेकानंद’ व्याख्यानमालेला सुरुवात झाली आहे. व्याख्यानाचा विषय आहे ‘स्वामी विवेकानंदांचं जीवन व कार्य’. विख्यात प्रवचनकार डॉ. शंकरराव अभ्यंकर हे या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते आहेत.
’स्थळ : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, शहाजीराजे मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७.
’वेळ : संध्याकाळी ७ ते ९.
’शेवटचा दिवस : गुरुवार, १७ जानेवारी २०१३
‘स्वरमयीचे’ सूर गुंजणार..
संगीत कार्यक्रम भरवून मिळालेल्या उत्पन्नातून अंध, अपंग, मतिमंद आणि मूकबधिर तसंच कर्करोग पीडितांना आर्थिक मदत करणं ‘स्वरमयी’ संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत संस्थेने ७० कार्यक्रमांतून ८ हजार ८९० अंध आणि अपंग मुलांकरता व्यासपीठ दिलं आहे. त्यांच्या अपंगत्त्वावर मात करण्यासाठी भरघोस मदतही केली. येत्या २३ जानेवारीला ‘स्वरमयी’चा शिवाजी मंदिर इथे संगीत कार्यक्रम होत आहे. यावेळी अपंग मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केलेली कलेची साधना श्रोत्यांना पाहाता येईल.
’स्थळ : शिवाजी मंदिर, प्लाझा चित्रपटगृहासमोर, एन.सी. केळकर मार्ग, दादर ’वेळ : रात्री ७.३०