गुजरात विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा भाजपला सत्ता मिळाली असली तरी गुजरातच्या जनतेने मोदी सरकारमधील पाच मंत्र्यांना घरी बसवले आहे.
अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा भाजपला सत्ता मिळाली असली तरी गुजरातच्या जनतेने मोदी सरकारमधील पाच मंत्र्यांना घरी बसवले आहे. यात तीन ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री तर दोन नव्या मंत्र्यांचा समावेश आहे.
कृषीमंत्री दिलीप संघवी यांचा काँग्रेसच्या परेश धनानी यांनी अमरेली मतदार संघातून २९ हजार ८९३ मतांनी पराभव केला. आरोग्यमंत्री जयनारायण व्यास यांचा काँग्रेसच्या बलवंतसिंग राजपूत यांनी सिध्दपूर मतदार संघातून २५ हजार ८२४ मतांनी पराभव केला. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री फकीरभाई वाघेला यांचा काँग्रेसच्या जेठाभाई वाघेला यांनी वडगाम मतदार संघातून २२ हजार ८३९ मतांनी पराभव केला.
वन आणि पर्यावरण मंत्री किरीटसिंग राणा यांचा अत्यंत चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे खासदार सोमा गंडा यांनी सुरेंद्रनगर जिल्ह्यातील लिंब्दी मतदार संघातून १ हजार ५६१ मतांनी पराभव केला. तर कृषी राज्यमंत्री कनुभाई भागला यांचा गुजरात परिवर्तन पार्टी (जीपीपी) चे अध्यक्ष केशुभाई पटेल यांनी विसावदार मतदार संघातून ४२ हजार १८६ मतांनी पराभव केला.
गेल्यावेळी १८२ सदस्यांच्या गुजरात विधानसभेत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ११७ जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र अवघ्या ११६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.