गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली.
नागपूर- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची रविवारी भेट घेतली. मोदी यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील राजकीय परिस्थीतीची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोदी यांच्या भेटीमागे गुजरात विधानसभा निवडणुकीचा संदर्भ असला तरी २०१४मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीसाठी मोदींकडून केल्या जाणा-या प्रयत्नाचा एक भाग असल्याची चर्चा आहे. मोदींनी भागवतांसह भय्यजी जोशी, सुरेश सोनी आदींशी विविध विषयांवर चर्चा केली.
मात्र या भेटीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अशा प्रकारच्या विषयात लक्ष घालत नसल्याचे मोदींनी सांगितले.
गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमातून मोदी रविवारी विशेष विमानाने नागपूरमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी मोदींना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे असे मत व्यक्त केले होते.
दरम्यान, मोदी यांची भेट राजकीय नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. भाजपचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची भेट घेत असतात. यामागे राजकीय चर्चा होत असते असे म्हणणे चुकीचे ठरले असे भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले.