गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील अमेरिकेतील व्हिसा बंदी उठवण्याची मागणी करणारे अमेरिकन कायदेमंडळाचे सदस्य जो वॉल्श यांचा काँग्रेशनल निवडणूकीत पराभव झाला आहे.
वॉशिंग्टन – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील अमेरिकेतील व्हिसा बंदी उठवण्याची मागणी करणारे अमेरिकन कायदेमंडळाचे सदस्य जो वॉल्श यांचा काँग्रेशनल निवडणूकीत पराभव झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे टॅमी डकवर्थ यांनी त्यांचा १० टक्के मतांच्या फरकाने पराभव केला. जो वॉल्श टी पार्टीचे सदस्य आहेत. मोदी यांच्या व्हीसावरील बंदी उठवण्याची जाहीररित्या मागणी करणारे वॉल्श अमेरिकन कायदे मंडळाचे पहिले सदस्य होते.
इंडियन अमेरिकन मुस्लिम काऊंसिलसह भारतीय अमेरिकन समूहांनी वॉल्श यांच्या पराभवाचे स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता कायद्यातंर्गत मोदी यांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी आहे. या कायद्यातंर्गत धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा कुठलाही परदेशी सरकारी अधिकारी अमेरिकन व्हीसासाठी अपात्र ठरतो.
इस्त्रायलचे खंदे पाठिराखे असणारे वॉल्श मोदी यांच्या व्हीसाचे जाहीररित्या समर्थन करणारे पहिले प्रतिनिधी होते. २००२ सालच्या गुजरात दंगलींना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांवरुन अमेरिकेने मोदी यांच्या व्हीसावर बंदी घातली आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमांनुसार वॉल्श यांची जागा निवडून आणण्यासाठी अखेरच्या टप्याप्यात प्रचंड पैसा खर्च करण्यात आला होता.