मेट्रो-३ मार्गात उभारल्या जाणा-या आरे कार डेपोबाबत ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ला (एमएमआरसी) तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मुंबई – मेट्रो-३ मार्गात उभारल्या जाणा-या आरे कार डेपोबाबत ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ला (एमएमआरसी) तात्पुरता दिलासा मिळाला आहे. नवीन बांधकाम प्रकल्पांसाठीचे निर्बंध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून १०० मीटपर्यंत मर्यादित राहतील, असा निर्णय बुधवारी पुणे येथे राष्ट्रीय हरित लवादाच्या सुनावणीदरम्यानदेण्यात आला.
सोबत दिल्ली, कलकत्ता आणि इतर शहरात मेट्रो प्रकल्पांसाठी उभारल्या गेलेल्या कारडेपोच्या बांधकामासाठी जागेचा तपशील सादर करण्याचे आदेश हरित लवादाने एमएमआरसीला दिले आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. पुढील सुनावणी १९ जानेवारीपर्यंत होणार आहे.
एमएमआरसीद्वारे कुलाबा ते सिप्झ या ३३.५ कि. मी. मार्गावर मेट्रो-३ प्रकल्प उभारला जाणार आहे. या मार्गात आरे कॉलनीत कारडेपो उभारण्याचे नियोजित आहे. कारडेपोच्या बांधकामामुळे हजारो झाडांची तोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमी संघटनांनी बांधकामास विरोध केला आहे.
कारडेपोबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांद्वारे समिती नेमण्यात आली. मात्र अद्याप समितीद्वारे अंतिम निर्णय घेतला गेला नाही. आरे कॉलनीत कोणत्याही स्वरूपाच्या बांधकामांना परवानगी देऊ नका, असा आदेश देत या भागात अनधिकृत बांधकाम आढळल्यास तात्काळ जमीनदोस्त करावे, असे आदेश हरित लवादाने मुंबई महापालिकेला गेल्या वर्षी दिले होते. यामुळे आरे येथील मेट्रो कारडेपो अडचणीत आला होता. नवीन बांधकाम प्रकल्पांकरिता असणारे निर्बंध हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून १०० मीटपर्यंत मर्यादित राहील, असे हरित लवादाने स्पष्ट केले. मेट्रो प्रकल्पासाठी ही चांगली बातमी आहे. अंतिम निर्णय पुढील सुनावणी दरम्यान होईल, असे ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले.