मेट्रो-२ प्रकल्पाला वेग मिळणार आहे. एमएमआरडीएद्वारे डी. एन. नगर-मानखुर्द मार्गावर उभारण्यात येणा-या मेट्रो-२ प्रकल्पाला ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ (एडीबी) अर्थसहाय्य देण्याची शक्यता आहे.
मुंबई – मेट्रो-२ प्रकल्पाला वेग मिळणार आहे. एमएमआरडीएद्वारे डी. एन. नगर-मानखुर्द मार्गावर उभारण्यात येणा-या मेट्रो-२ प्रकल्पाला ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ (एडीबी) अर्थसहाय्य देण्याची शक्यता आहे. या संदर्भात एडीबीच्या अधिका-यांची एमएमआरडीएसोबत नुकतीच बैठकही झाली. या बैठकीत एडीबीने आगामी मेट्रो प्रकल्पास अर्थसहाय्य देण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असल्याचे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
एमएमआरडीएद्वारे दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या ४० कि.मी. लांबीचा मेट्रो-२ मार्गावर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांत विभागण्यात आला आहे. दहिसर ते डी. एन. नगर १८ कि.मी., वांद्रे ते मानखुर्द १० कि.मी. आणि डी. एन. नगर ते वांद्रे १२ कि.मी. अशा तीन टप्प्यांत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला डी. एन. नगर-वांद्रे प्रकल्प बांधणीसाठी जमिनी संदर्भात अडचण उद्भवली होती. मात्र यातून मार्ग काढत एमएमआरडीएने डी. एन. नगर-वांद्रे मेट्रो प्रकल्प वांद्रे-मानखुर्द प्रकल्पासोबत एकत्रित करण्याचे ठरवले.
यामुळे डी. एन. नगर-मानखुर्द असा २२ कि.मी. लांबीचा नवा मार्ग तयार झाला आहे. बँकेने दहिसर-अंधेरी मेट्रो आणि दहिसर (पू.) ते अंधेरी (पू.) मेट्रो-७ प्रकल्पाला अर्थसहाय्य देण्याची तयारी दर्शवली आहे. मेट्रो-२ प्रकल्पाला अर्थसहाय्य देण्यासाठी बँकेने सकारात्मकता दर्शवली आहे. डी. एन. नगर-मानखुर्द मेट्रो प्रकल्पावर १० हजार २६१ कोटी खर्च अपेक्षित आहे. एडीबी ४ हजार ५१५ कोटींचे अर्थसहाय्य देण्याची शक्यता आहे. हा निधी जवळपास प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ४६ टक्के असल्याचे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
अर्थसहाय्यच्या अभावी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याचे अनेकदा आढळले आहे. पण मेट्रो-२ प्रकल्पास वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यास प्रकल्पाच्या बांधकामास वेग धरण्याची शक्यता आहे. दहिसर-अंधेरी मेट्रो प्रकल्पाला ६ हजार २०८ कोटी तर दहिसर (पू.) ते अंधेरी (पू.) मेट्रो-७ प्रकल्पाला ६ हजार २०८ कोटी अर्थसहाय्य देण्याची तयारी एडीबीने दर्शवली आहे.