मेंदू मृत झालेल्या एका महिलेने अवयवदान करून चार जणांना जीवदान दिले आहे. डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ घोषित केल्यानंतर या महिलेचे यकृत, दोन मूत्रपिंड आणि हृदयदान करण्यात आले.
मुंबई – मेंदू मृत झालेल्या एका महिलेने अवयवदान करून चार जणांना जीवदान दिले आहे. डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ घोषित केल्यानंतर या महिलेचे यकृत, दोन मूत्रपिंड आणि हृदयदान करण्यात आले. या घटनेमुळे अनेक वर्षापासून अवयवांच्या प्रतीक्षेत असणा-या चौघांना नव्याने आयुष्य मिळाले आहे. २०१६ या वर्षातील हे सहावे ‘कॅडेव्हर डोनेशन’ आहे.
मुंबईत मागील वर्षी ४२ वेळा कॅडेव्हर डोनेशन करण्यात आले आहे. यात ३७ यकृत, ७२ मूत्रपिंड व पाच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून गरजू रुग्णांना नव्याने आयुष्य मिळाले आहे. त्यामुळे आता नवीन वर्षातही अवयवदान करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नालासोपारा येथे राहणा-या ५० वर्षीय महिलेचा ६ फेब्रुवारीला रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात संबंधित महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. या अपघातानंतर महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेच्या डोक्यात ‘ब्रेन स्ट्रोक’ झाल्याने त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारीला त्यांना ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले. पण मेंदूत रक्तस्रव झाल्याचे त्यांचा मेंदू मृत झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्याकडे अवयवदान करण्याची परवानगी मागितली.
आपल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव अन्य गरजू व्यक्तीला नवीन जीवनदान ठरू शकते, असा विचार करून मृत महिलेच्या भावाने अवयवदानाला परवानगी दिली. अवयवदानासाठी परवानगी मिळताच डॉक्टरांनी ‘विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती’ला (झेडटीसीसी) माहिती दिली. त्यानुसार, त्यांचे हृदय, यकृत व मूत्रपिंड दान करण्यात आले. हृदय फोर्टिस रुग्णालयातील ४८ वर्षीय महिलेला देऊन तिचे प्राण वाचविण्यात आले आहे. तर ज्युपिटर रुग्णालयात अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या ८० वर्षीय पुरुषाला यकृत व २४ वर्षीय मुलीला मूत्रपिंड दिले आहे. याशिवाय दुसरे मूत्रपिंड बॉम्बे रुग्णालयातील ३० वर्षीय महिलेला दिले आहे, अशी माहिती ज्युपिटर रुग्णालयातील प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक समितीकडून मिळाली.