राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे राघवाडी येथील एका मूकबधिर अल्पवयीन युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत गावातीलच तीन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.
राजापूर- तालुक्यातील गोठणे-दोनिवडे राघवाडी येथील एका मूकबधिर अल्पवयीन युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत गावातीलच तीन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. यातून ही युवती तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहितीही पुढे आली असून या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त होत आहे. ज्यांनी बलात्कार केला त्या तिघांपैकी एक तरुण अल्पवयीन असून एक अपंग आहे.
याबाबत पीडित युवतीच्या आईने राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजापूर पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे. संतोष यशवंत गुरव (३६, रा. गोठणे दोनिवडे गुरववाडी), श्रीपत धकटू राघव (२८, रा. गोठणे दोनिवडे राघवाडी) या दोन संशयित आरोपींना अटक केली असून तर तिसरा अल्पवयीन १६ वर्षाचा वाडीतीलच तरुण असून तो शाळेत शिकत आहे.
गणेशोत्सव काळात आपली मुलगी लाकडे जमा करण्यासाठी लगतच्या जंगलात गेली असता संतोष यशवंत गुरव याने जंगलात तिच्यावर जबरदस्ती करून तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तर श्रीपत राघव याने मुलीची आई घराबाहेर असताना त्याने घरात घुसून दोन वेळा बलात्कार केला. तर तिस-या अल्पवयीन तरुणानेही घरात घुसून दोन वेळा बलात्कार केल्याचे पीडित युवतीच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे.
मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला राजापुरात एका खासगी रुग्णालयात नेले असता तेथे करण्यात आलेल्या सोनोग्राफीत ती गर्भवती असल्याचे उघड झाले. या प्रकाराबाबत मुलीला विचारले असता तिने कागदावर या तरुणांची नावे लिहून आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. यातील संतोष व श्रीपत याला पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे.