स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत स्वच्छ व सुंदर मुंबई बनवण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेली मोहीम सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचराकुंडय़ा हटवून घरोघरी आणि सोसायटींमध्येच कचरा गोळा करण्याची पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई – स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत स्वच्छ व सुंदर मुंबई बनवण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेली मोहीम सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचराकुंडय़ा हटवून घरोघरी आणि सोसायटींमध्येच कचरा गोळा करण्याची पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
या अभियानांतर्गत मुलुंडमधील तब्बल २५ कचरा कुंडय़ा हटविण्यात महापालिकेला यश आले असून त्यात भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांच्या प्रभाग क्रमांक १०३ मधीलच १९ कचराकुंडय़ांचा समावेश आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कुंडय़ा हटवून कचरा कुंडय़ामुक्त मुलुंड बनला जात आहे.
‘खुल्या कचराकुंडीमुक्त परिसर’ मोहिमेंतर्गत मुलुंडमधील महापालिका ‘टी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील जॉन्सन अँड जॉन्सन, सर्वोदयनगर, नाहुर व्हिलेज आदी परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक १०३ मधील १९ तर मुलुंडमधील इतर प्रभागातील ६ ठिकाणच्या खुल्या कचराकुंडय़ा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच मुलुंडमधील उर्वरित खुल्या कचराकुंडय़ा देखील बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या भागातील कचराकुंडय़ा हटविण्यात आल्या आहेत, त्या परिसरातील कचरा महापालिकेच्या कचरा वाहक वाहनाद्वारे गोळा करण्यात येत आहे.
त्यानुसार ठरावीक वेळेनुसार महापालिकेची कचरा गोळा करणारी गाडी प्रत्येक सोसायटी व घरांच्या पुढे जात आहे. त्यावेळेसच संबंधितांनी महापालिकेच्या कचरा गाडीत कचरा आणून टाकण्याचे आवाहन विभाग कार्यालयाच्या वतीने केले जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या अथवा लोकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी नागरिकांना एसएमएस व व्हॉट्सअप आदी माध्यमे उपलब्ध करून दिली जात आहेत.
मुलुंडमधील कचराकुंडय़ामुक्त मोहिमेला मिळालेल्या यशाबद्दल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी १०३चे नगरसेवक मनोज कोटक आणि टी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची प्रशंसा केली. तसेच मुलुंडच्या धर्तीवर महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये या पद्धतीचा वापर करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.