मुरबाड-माळशेज मार्गावर सोमवारी सकाळी काळी-पिवळी प्रवासी जीप आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
मुरबाड- टोकावडेहून मुरबाडकडे जाणा-या काळी पिवळी प्रवासी जीपला कंटेनरमधील लोखंडी प्लेटने चिरत नेल्याने जीपमधील दोन प्रवासी जागीच ठार झाले तर अन्य पाच जण जबर जखमी झाले. जखमींपैकी दोघांवर मुरबाड ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघांवर सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर आणि एकावर कल्याण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त जमावाने कंटेनरला आग लावून माळशेज मार्गात रास्ता रोको केला.
टोकावडेहून मुरबाडकडे प्रवासी वाहतूक करणारी वैशाखरे गावातील अजित घरत यांच्या मालकीच्या एमएच ५ आर २१४३ नंबरच्या काळी पिवळी गाडीतून ७ प्रवासी मुरबाडच्या दिशेने प्रवास करत होते. सकाळी ८ वाजता माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वरील वडाचापाडा गावाजवळ मुरबाडमधील लॉइड स्टील कारखान्यातून कंपनी व्यवस्थापनाच्या गेट बुक वर नोंद न करताच २७ जुलैला दुपार नंतर ३: ४० वाजता लोखंडी प्लेट घेऊन जाणा-या एन.एल. ०२ एल.२५७२ क्रमांकाच्या कंटेनर जवळून गाडी गेली असता कंटेनरमधून बाहेर आलेल्या १४ फुट लांबीच्या प्लेटने जीपचा पत्रा चिरून जीप मुरबाडहून शिर्डीकडे जाणा-या बसवर आदळल्याने जीपचालक वैभव बाळकृष्ण निचिते (२३,रा. एकलहरे) आणि ज्ञानेश्वर जयवंत घोलप (४५,रा.मानिवली) या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर पाच जखमी प्रवाशांपैकी बबन नामा दळवी (५७), वसंत नारायण वारघडे (५६) यांच्यावर मुरबाड ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तसेच नंदकुमार रामचंद्र वारघडे (२२) आणि दीपक बाबू बोराडे (३५) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाला किरकोळ मार लागल्यामुळे त्याच्यावर उपचार करून घरी पाठवण्यात आले.
कंटेनर मालक अथवा कंपनीने १४ फूट रुंदीचा हा जॉब नेण्यासाठी रस्ते आणि वाहतूक नियंत्रण कक्षाची परवानगी घ्यायला हवी होती. परंतु परवानगी न घेताच कंपनीने हा जॉब अवैध पद्धतीने कंपनीतून बाहेर काढला आहे. – निमसे एस. एल. पोलिस निरीक्षक, रस्ते आणि वाहतूक नियंत्रण कक्ष