रिक्षाचालकांच्या मुजोरीला नागरिक कंटाळले असतानाच; या रिक्षावाल्यांपुढे देवही हतबल झाल्याचे चित्र सध्या नालासोपारा पश्चिमेकडे पाहायला मिळत आहे.
नालासोपारा- रिक्षाचालकांच्या मुजोरीला नागरिक कंटाळले असतानाच; या रिक्षावाल्यांपुढे देवही हतबल झाल्याचे चित्र सध्या नालासोपारा पश्चिमेकडे पाहायला मिळत आहे. नालासोपारा पश्चिमेकडील पंचमुखी हनुमान मंदिराच्या आवारालाच रिक्षावाल्यांनी रिक्षा स्टँड बनवल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. भाविकांच्या या संतापाचा कडेलोट होण्याआधीच; हा अनधिकृत तळ इथून हलवावा, अशी मागणी पंचमुखी हनुमान मंदिर मंडळाने केली आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपोसमोरच हे पंचमुखी हनुमान मंदिर आहे. हा रस्ता मुख्य रस्त्याला मिळत असल्याने या मार्गावर मोठय़ा प्रमाणात बस, टँकर, ट्रकसारख्या अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यात आता याच मार्गावर भररस्त्यात आणि मंदिरासमोरच रिक्षावाल्यांनी आपला अनधिकृत रिक्षा स्टँड बनवला आहे.
विनंती करूनही मुजोर रिक्षाचालक या ठिकाणाहून हटत नाहीत. परिणामी पंचमुखी हनुमान मंदिर मंडळाने वसई वाहतूक विभागाकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे, मात्र या तक्रारीची दखल अद्याप वाहतूक विभागाने घेतलेली नसल्याने मंडळासह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून; भाविकांच्या संतापाचा कडेलोट होण्यापर्यंत वाहतूक विभाग आणि रिक्षाचालकांनी वाट पाहू नये, असा इशारा रिक्षावाल्यांना दिला आहे.