मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नीला पुण्यात आयोजित पुरस्कार सोहळ्यात एका महाराजांनी त्यांच्या ‘अद्भुत चमत्कार शक्ती’ने ‘हवेतून’ चक्क २२ कॅरेट शुद्ध सोन्याचे मंगळसूत्र काढून दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई – अंधश्रद्धेविरोधातील लढाई आणि पुरोगामित्वाचे ढोल पिटणा-या युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नीला पुण्यात आयोजित पुरस्कार सोहळ्यात एका महाराजांनी त्यांच्या ‘अद्भुत चमत्कार शक्ती’ने ‘हवेतून’ चक्क २२ कॅरेट शुद्ध सोन्याचे मंगळसूत्र काढून दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एकीकडे राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अमलात आहे, दुसरीकडे निर्मूलन चळवळीतील अग्रणी आणि पुरोगामी विचारवंतांचे मारेकरी अद्यापही ‘सापडत’ नसताना, मुख्यमंत्रीणबाईच या घटनेचे ‘हा काही जादूटोणा नव्हता, खर्रच त्यांनी मला माळ दिली..’ म्हणत या बुवाबाजीचं समर्थन करत असल्यामुळे एकप्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचेच पुरोगामी महाराष्ट्रातून निर्मूलन झाले आहे.
पुण्यात ब्रह्मर्षी गुरुवानंद महाराज यांच्या उपस्थितीत रविवारी ‘सूर्यदत्त पुरस्कार’ प्रदान झाले. मुख्यमंत्रीणबाई सौ. अमृता फडणवीस यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अनेक नामवंत मंडळीही उपस्थित होती. बहुधा महाराजांनाही मुख्यमंत्रीणबाई आल्या असल्याची खबर अंतज्र्ञानाने प्राप्त झाली होती. त्यामुळे मंचावर असलेल्या अमृताताई महाराजांसमोर नतमस्तक होत असतानाच महाराजांनी हवेत हात उंचावून बोटांची जादूई हालचाल केली आणि काय आश्चर्य, त्यांच्या या बोटांमधून एक मंगळसूत्र ‘अवतरले.’ हे मंगळसूत्र महाराजांनी ताईंच्या गळ्यात घातले आणि त्या धन्य झाल्या. हे मंगळसूत्र २२ कॅरेटचे आणि शुद्धतेच्या हॉलमार्कचा ठसा असणारेही होते. यामुळे महाराज ख-या सोन्याचे पारखी असल्याचाही अनुभव उपस्थित भक्तगणांना आला.
महाराजांनी दिलेल्या या कृपाप्रसादानंतर अमृताताईंनीही, हा काही जादूटोणा नव्हता.. असे म्हणत या चमत्काराला पुष्टी दिली. ‘मला या सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. मी सन्माननीय पाहुणीही होते. या वेळी महाराजांनी मला त्यांच्या हातातून एक माळ दिली..’, असे त्यांनी एका वाहिनीला दूरध्वनीवरून सांगितले. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन करू पाहणा-या सर्वच कार्यकर्त्यांची बोलती बंद झाली आहे. अमृताताई ‘अॅक्सिस’ या ख्यातकीर्त बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. यामुळे त्यांच्या या प्रमाणपत्राला जणू सोन्याचे मोल आहे.
शनिशिंगणापूर येथील महिलाविरोधी अनिष्ट प्रथांचे समर्थन करणारे मंत्रिगण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आता मुख्यमंत्र्यांचे ‘होम मिनिस्टर’ही बुवाबाजीचे समर्थन करत असल्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची अधोगती वेगाने सुरू झाली असल्याची खंत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. ‘अंनिस’चे राज्य सचिव अविनाश पाटील यांनी या बुवाबाजीचा निषेध केला असून, पुरोगामी म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रात असे प्रकार चालतात आणि उपस्थितांपैकी कुणीही त्याबद्दल चकार शब्द उच्चारत नाही, हे निषेधार्ह आहे, असे म्हटले आहे.
गुरूवानंद महाराजांच्या समोर एखादी साधीसुधी गृहिणी नतमस्तक झाली असती तर तिला असा सोन्याच्या मंगळसूत्राचा, किमान छोटय़ाशा कर्णभूषणांचा तरी प्रसाद महाराजांनी हवेतून काढून दिला असता का? असा प्रश्न धुळे येथील दिलीप साळुंके यांनी विचारला आहे. मुळात अशा सर्वसामान्य महिलेला या कार्यक्रमात, महाराजांच्या मंचापर्यंत जाता आले असते का? अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.