भाजपाच्या महिला कार्यकर्त्यां मैथिली जावकर यांनी भाजयू मोर्चाचे माजी अध्यक्ष गणेश पांडेविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
मुंबई- भाजपाच्या महिला कार्यकर्त्यां मैथिली जावकर यांनी भाजयू मोर्चाचे माजी अध्यक्ष गणेश पांडेविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही गणेश पांडेवर कारवाई होत नसेल तर त्याला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व महिला आमदारांनीही आक्रमक होत पांडेवर कारवाईची मागणी केली.
प्रश्नोत्तराचा तास संपताच जयंत पाटील यांनी गणेश पांडेंचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले की, भाजपाच्या मैथिली यांनी गणेश पांडेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी लिहिलेले पत्र इथे जाहीरपणे वाचता येणार नाही. गणेश पांडेंचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत.
बेकायदा गुटख्या संदर्भातही त्यांच्या नावाची चर्चा असल्याने ही महिला भयभीत झाली आहे. या महिलेने एफआयआर दाखल केला. महिला आयोगाकडे तक्रारही केली आहे. परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षा भाजपाच्या असल्यामुळे या पीडित महिलेला न्याय मिळेल, असे वाटत नाही.
याची चर्चा सभागृहात यापूर्वीच झाली आहे. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडेविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून या पांडेला कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.