मुंबई महापालिकेतील १०० कोटी रुपयांच्या ई-निविदा घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपानंतर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सभागृहात घोटाळ्याची कबुली दिली.
मुंबई – मुंबई महापालिकेतील १०० कोटी रुपयांच्या ई-निविदा घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपानंतर पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सभागृहात घोटाळ्याची कबुली दिली.
प्राथमिक चौकशीत २२ कोटी रुपयांच्या कामांसाठी मागवलेल्या निविदांमध्ये घोटाळा दिसत असला, तरी प्रत्यक्षात यांपैकी साडेसहा कोटींचाच गैरव्यवहार झाल्याचे कुंटे म्हणाले. यात गुंतलेल्या २३ अभियंत्यांपैकी ९ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले असून, ४० कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकल्याची माहिती त्यांनी दिली.
ई-निविदा प्रकरणात कंत्राटदारांचे भले करण्यासाठी अभियंत्यांनी नियमबाह्य निविदा प्रक्रिया राबवल्याने १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला होता. यावरून गेले आठ दिवस पालिकेतील वातावरण तापले आहे.
महापालिका आयुक्तांना विरोधी पक्षनेत्यांनी लक्ष्य केल्यानंतर अखेर कुंटे यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत याबाबत निवेदन केले. गेल्या दोन वर्षात ई-निविदा प्रक्रियेअंतर्गत विभाग कार्यालये, रुग्णालये व इतर खात्यांमार्फत सुमारे १७ हजार निविदा काढण्यात आल्या. त्यांची कंत्राटाची किंमत ६०० कोटी रुपये आहे.
मात्र या निविदांपैकी ४१२ निविदा २४ तासांच्या आत उघडण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले. त्याचे कंत्राटमूल्य २२ कोटी रुपये आहे. या निविदांपैकी १३ कोटी ८ लाख रुपयांच्या २२९ निविदा सहायक आयुक्तांनी यापूर्वीच रद्द केल्या आहेत. तर उर्वरित १८३ निविदांची कामे पूर्ण झाली आहेत.
त्यांची अंदाजित रक्कम ९ कोटी २६ लाख असून, निविदा बोलीतील कमीत कमी कंत्राटमूल्य ६ कोटी ४१ लाख रुपयांचे असल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे सदोष निविदा प्रक्रिया हाताळण्यात प्रथमदर्शनी २३ अभियंते गुंतल्याचे आढळून आले आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांपैकी ९ अभियंत्यांना निलंबित करण्यात आल्याचे कुंटे यांनी सांगितले.