२००८ मध्ये मुंबईवर झालेला २६/११ हल्ला हा शौर्यपूर्ण होता तर जर्मन बेकरीमध्ये झालेला स्फोट हा सुंदर होता, असा उल्लेख अल-कायदा संघटनेच्या कागदपत्रात केल्याचे समोर आले आहे.
वॉशिंग्टन – २००८ मध्ये मुंबईवर झालेला २६/११ हल्ला हा शौर्यपूर्ण होता तर जर्मन बेकरीमध्ये झालेला स्फोट हा सुंदर होता असा उल्लेख अल-कायदा संघटनेच्या कागदपत्रात केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनची हत्या केल्यानंतर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने तेथून हस्तगत केलेल्या कागदपत्रांतून ही माहिती समोर आली आहे.
‘टेरर फ्रेंचाइजीज द अनस्टॉपेबल एसासिनः टेक्स वाइटल रोल फॉर इट्स सक्सेज‘ या १५ पानी पत्रांमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रामध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याचे वर्णन हे शौर्यपूर्ण असे केले आहे.
अमेरिकेने बुधवारी ही पत्रे उघड केली. २०११ मध्ये अमेरिकेच्या लष्कराने ओसामा बिन लादेनला ठार केले होते. यानंतर तेथून ही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. अल-कायदाचा नेता अबू सालिह अल सोमाली याने ओसामा बिन लादेनशी हल्ल्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता.
या पत्रात मुंबईवरील हल्ला हा शौर्यपूर्ण होता. यामध्ये अनेक अमेरिकी नागरिकांसह अनेक पश्चिमेकडील नागरिक ठार झाले होते. तर जर्मन बेकरीतील स्फोट हा सुंदर होता. या भागाला अनेक ज्यू आणि पश्चिमेकडील नागरिक भेट देत असत.
नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १६६ जणांचे प्राण गेले. यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. तर फेब्रुवारी २०१० मध्ये झालेल्या जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला.