माजी विजेता मुंबई इंडियन्स संघ सोमवारी (२४ एप्रिल) घरच्या मैदानावर रायझिंग पुणे सुपरजायंटशी दोन हात करेल.
मुंबई- माजी विजेता मुंबई इंडियन्स संघ सोमवारी (२४ एप्रिल) घरच्या मैदानावर रायझिंग पुणे सुपरजायंटशी दोन हात करेल. आयपीएलच्या दहाव्या हंगामात विजयाचा ‘षटकार’ ठोकणा-या रोहित शर्मा आणि कंपनीला विक्रमी सातव्या विजयाची संधी आहे.
मुंबईने जबरदस्त फॉर्म राखताना सलग सहा विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानही राखले आहे. आणखी एक विजय त्यांना सर्वाधिक सलग सामने जिंकणा-या संघांच्या पंक्तीत नेऊन बसवू शकतो. विजयाचा ‘षटकार’ ठोकला तरी मुंबईची दहाव्या मोसमाची सुरुवात खराब झाली. सलामीला त्यांना पुण्याकडून मात खावी लागली होती. परतीच्या लढतीत पराभवाची परतफेड करण्यादृष्टीने यजमान संघ मैदानात उतरेल. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील पुणे संघाला ६ सामन्यांतून तीन विजय मिळवता आलेत. तितकेच पराभव पाहावे लागलेत. गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या पुण्याने दमदार पुनरागमन करताना मागील दोन सामने जिंकलेत. सलामीचा विजय आणि आताच्या सलग दोन विजयामुळे पाहुण्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.
मुंबईचे सातत्य वाखाणण्याजोगे आहे. उंचावलेली सांघिक कामगिरी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरू शकते. आघाडीचा फलंदाज नितीश राणा (७ सामन्यांत २६३ धावा), सलामीवीर जोस बटलर (७ सामन्यांत २१३ धावा), किरॉन पोलार्डने (७ सामन्यांत १९० धावा) फलंदाजीत चांगले योगदान दिले आहे. गोलंदाजीत मध्यमगती गोलंदाज मिचेल मॅकक्लेनॅघनने (७ सामन्यांत १२ विकेट) अचूक आणि नियंत्रित मारा केला आहे. ताज्या दमाचे जसप्रीत बुमरा (७ विकेट) आणि हार्दिक पंडय़ा (५ विकेट) ब-यापैकी चमकलेत. सांघिक कामगिरी उंचावली तरी मुंबईसमोर अनेक समस्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा (७ सामन्यांत ५४ धावा) आणि ऑफस्पिनर हरभजन सिंगला (६ सामन्यांत ३ विकेट) अद्याप सूर गवसलेला नाही. वेगवान गोलंदाज लसित मलिंगानेही (४ सामन्यांत ४ विकेट) निराशा केली आहे.
कर्णधार स्मिथचे (५० सामन्यांत २०७ धावा) सातत्य, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर तसेच राहुल त्रिपाठीच्या ‘पॅचेस’मधील कामगिरीमुळे फलंदाजी थोडी चांगली होत असली तरी अजिंक्य रहाणे (६ सामन्यांत १२१ धावा) आणि यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला (६ सामन्यांत ११० धावा) लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीतही खूप सुधारणा आवश्यक आहे. लेगस्पिनर इम्रान ताहीर (६ सामन्यांत ९ विकेट) थोडा यशस्वी ठरला आहे. मात्र रजत भाटिया, जयदेव उनाडकट आणि शार्दूल ठाकूर अपयशी ठरलेत.
वेळ : रा. ८ वा.
सर्वाधिक सलग सामने जिंकणारे संघ
आयपीएलमध्ये सर्वाधिक सलग सामने जिंकणा-या संघांमध्ये माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी आहे. त्यांनी २०१४-१५ हंगामात तब्बल १० सामने जिंकले होते. दुस-या क्रमांकावर किंग्ज इलेवन पंजाब आहे. २०१४मध्ये त्यांना आठ विजय मिळवता आले. तिस-या स्थानी माजी विजेता चेन्नई सुपर किंग्ज (२०१३) आणि बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स (२०११) यांच्यात ‘टाय’ आहे. दोघांनी प्रत्येकी सात सलग सामने जिंकलेत. मुंबईने सोमवारी विजय मिळवल्यास ते चेन्नई आणि बंगळूरुसह संयुक्तरित्या तिसरे स्थान मिळवतील.