शिवसेना-भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून युती तोडण्याची भाषा केली जात असतानाच मुंबईत प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई- शिवसेना-भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून युती तोडण्याची भाषा केली जात असतानाच मुंबईत प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या ८ प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला विश्वासात न घेता स्वतंत्र उमेदवार दिल्याने भाजपात तीव्र संतापाची लाट उसळून त्यांनीही शिवसेनेशी काडीमोड घेत आठपैकी तीन प्रभाग समितीत आपले स्वतंत्र उमेदवार देत सेनेपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. अशा प्रकारे प्रथमच पालिका प्रभाग समिती इतिहासात सेना-भाजपा स्वतंत्रपणे लढत आहेत.
मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांपैकी ८ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी गुरुवार, ७ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. या सर्व प्रभागांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरले गेले. मात्र, या आठही प्रभागांमध्ये शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार देत भाजपासाठी एकही समिती सोडली नाही. किंबहुना उमेदवारी अर्ज भरताना भाजपाला विश्वासात घेतले नाही.
प्रत्येक वेळी प्रभाग समिती अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरताना त्यात सूचक व अनुमोदक हे युतीचे नगरसेवक असतात. परंतु या आठही ठिकाणी शिवसेनेचेच नगरसेवक सूचक व अनुमोदक होते.
त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी परस्पर उमेदवारी अर्ज भरल्यामुळे भाजपा गोटात खळबळ माजून त्यानंतर संध्याकाळी सर्व सूत्रे हलत भाजपाने चार प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज भरले. यापैकी तीन प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसमोरच भाजपाने आपले उमेदवार उभे केले आहेत.
यापूर्वी भाजपाला सोडण्यात आलेल्या ‘सी’ व ‘डी’, ‘पी/उत्तर’, ‘आर/उत्तर व मध्य’, आणि ‘आर/दक्षिण’ या चार प्रभाग समित्यांमध्ये भाजपाच्या नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज चिटणीसांकडे सादर केले. एफ/दक्षिण व उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या वतीने हेमांगी वरळीकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
या प्रभागात भाजपाचे तीन नगरसेवक असून याठिकाणी राजेश्री शिरवाडकर या उमेदवारी अर्ज भरण्यास गेल्या होत्या. परंतु अर्ज भरण्याची वेळ ही सायं. ५.३०ची असल्यामुळे तसेच अनुमोदक हे आमदार तमिल सेल्वन असल्याने त्यांना येण्यास उशीर झाला. यामुळे या ठिकाणी भाजपाला उमेदवारी अर्ज भरता आला नाही.
तरीही तीन प्रभागांमध्ये शिवसेना उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज हे मतदानापूर्वी १५ मिनिटे अगोदर मागे घेण्यास पीठासीन अधिका-यांकडून परवानगी दिली जाते. त्यामुळे येणा-या ७ एप्रिल रोजी भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम आहे की त्यात बदल करते यावर सर्वाचे लक्ष आहे.
भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ८ प्रभाग समितीत शिवसेनेने आधी स्वतंत्र उमेदवार दिले. त्यांनी याची कल्पना भाजपाला दिली नाही किंबहुना स्थानिक नगरसेवकांना दिली नाही.
त्यामुळे त्यांच्या परस्पर निर्णयाची बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आमच्या नगरसेवकांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले आहे. त्यानुसार ‘सी व डी’, ‘पी/उत्तर’, ‘आर/उत्तर व मध्य’, आणि ‘आर/दक्षिण’ या चार प्रभाग समित्यांमध्ये भाजपा नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज भरले असल्याचे त्यांनी सांगितले.
युती का तुटली?
प्रभाग समिती अध्यक्षपदाचे वाटप महापालिकेतील गटनेते करत असतात. परंतु या वेळी शिवसेनेच्या गटनेत्यांनी भाजपाच्या गटनेत्यांशी चर्चाच केलेली नसून परस्पर सर्व जागांवर उमेदवारी अर्ज भरले. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे आणि सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगून हात झटकण्याचे काम केले.
परंतु के/पूर्व प्रभाग समिती या वेळी भाजपाला हवी असून ती देण्यास नकार देण्यात आला. त्यावरून एका के/पूर्व प्रभाग समितीवरूनच युतीत बेबनाव झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रभाग समिती अध्यक्षपदाचे उमेदवार
ए,बी आणि ई : शहाना रिझवान खान (काँग्रेस), अॅड. मकरंद नार्वेकर
सी व डी : अनिल सिंह (शिवसेना), सरिता अजय पाटील (भाजपा)
एफ/दक्षिण व उत्तर : हेमांगी वरळीकर (सेना),पल्लवी मुणगेकर (काँग्रेस)
जी/दक्षिण : हेमलता वांगे (मनसे), मानसी दळवी (सेना),
पी/दक्षिण : लोचना चव्हाण-शिवसेना (बिनविरोध),
पी/उत्तर : सुनील गुजर(सेना), अॅड. ज्ञानमूती शर्मा (भाजपा), परमिंदर भामरा (काँग्रेस),
आर/दक्षिण : योगेश भोईर (काँग्रेस), मुकेश मिस्त्रि (भाजपा)
आर/उत्तर व मध्य : शीतल मुकेश म्हात्रे (सेना), आसावरी पाटील (भाजपा), शिवानंद शेट्टी (काँग्रेस)