गिर्यारोहण हा धर्म समजून प्रामाणिकपणे भटकंती करणा-या भटक्यांना एकत्र आणण्याचं कर्तव्य निभावलं आहे, ‘रॉक क्लायंबर्स क्लब’ने. निमित्त आहे ‘सह्याद्रीमित्र स्नेहसंमेलन’चं.
![Vijaydurg_fort_](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/01/Vijaydurg_fort_-300x126.jpg)
गिर्यारोहण हा धर्म समजून प्रामाणिकपणे भटकंती करणा-या भटक्यांना एकत्र आणण्याचं कर्तव्य निभावलं आहे, ‘रॉक क्लायंबर्स क्लब’ने. निमित्त आहे ‘सह्याद्रीमित्र स्नेहसंमेलन’चं. दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळात १५ आणि १६ जून रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत संमेलन रंगेल.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी १०.३० वाजल्यापासून ‘महाराष्ट्राची दुर्गरत्ने’ या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. संमेलनाचाच एक भाग असणा-या ‘सह्याद्री मित्र छायाचित्रण स्पर्धा-२०१३’मध्ये भाग घेतलेल्या छायाचित्रकारांची निवडक छायाचित्रं या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. संमेलनादरम्यान प्रसिद्ध इतिहास संशोधक आप्पा परबलिखित पुस्तकांचे प्रदर्शनही या वेळी पाहण्यात येईल. कित्येक दशकं स्वत: भ्रमंती करून संपादित केलेल्या माहिताचा खजिना पुस्तक प्रदर्शनातून मिळेल.
गिर्यारोहण, प्रस्तरारोहण यांसारखी सहजी भ्रमंती असो किंवा साधं सरळ पर्यटन असो आपल्याला पर्यटनासाठी आवश्यक ते साहित्य बाळगावंच लागतं. संमेलनादरम्यान ‘स्ट्रॉब शॉप’तर्फे आवश्यक आणि उपयुक्त असं उच्च दर्जाचं भटकंतीसाठी उपयुक्त असणारं साहित्य प्रदर्शन आणि विक्रीस ठेवण्यात येणार आहे. कित्येक र्वष गिर्यारोहण आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी मंडळींद्वारे ‘स्ट्रॉब शॉप’ सुरू करण्यात आलं आहे.
या प्रदर्शनांव्यतिरिक्त संमेलनात ‘व्याख्यान आणि स्लाइड-शो’चा कार्यक्रम दोन्ही दिवशी ठेवण्यात आला आहे. पहिल्या दिवशी ‘सह्याद्री मित्र-एक ओळख’, ‘महाराष्ट्रातील किल्ले’, ‘दुर्गवीर-ध्यास दुर्गसंवर्धनाचा’ या विषयांवर ‘व्याख्यान आणि स्लाइड शो’चा कार्यक्रम होईल. ‘गिर्यारोहणातील खबरदारी’, ‘गिर्यारोहण आणि योगाभ्यास’ या विषयांवरचे ‘व्याख्यान आणि स्लाइड शो’चा कार्यक्रम दुस-या दिवशी रंगेल.
‘व्याख्यान आणि स्लाइड शोज’साठी उपस्थित राहण्याची पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी http://www.guerillaadventures.com/ sahyadri-mitra.html या लिंकचा उपयोग करावा. दुस-या दिवशी ‘सह्याद्री मित्र पुरस्कार वितरण सोहळा’ होईल. संमेलनादरम्यान ‘गिर्यारोहण आणि गिरिभ्रमण (संस्था)’, ‘गिर्यारोहण आणि गिरिभ्रमण (व्यक्ती)’, ‘प्रस्तरारोहण (रॉक क्लायंबिंग)(संस्था)’, ‘प्रस्तरारोहण (रॉक क्लायंबिंग)(व्यक्ती), ‘दुर्गसंवर्धन (संस्था)’, ‘निसर्गमित्र (व्यक्ती/संस्था)’, ‘मार्गदर्शक (व्यक्ती/संस्था)’, ‘साहित्य (व्यक्ती) (कोणतंही माध्यम)’, ‘जीवनसन्मान (व्यक्ती)’ या विभागांसाठी सह्याद्री मित्र पुरस्कारांचं वाटप करण्यात येईल.
या स्नेहसंमेलनात मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक गिर्यारोहण संस्था सहभागी होणार असून सामान्य नागरिकांनीही भाग घ्यावा, असं आवाहन ‘रॉक क्लायंबर्स’ने केलं आहे.