मुंबई पश्चिम उपनगरातील तीन केंद्रांवर रविवारी झालेल्या फेरमतदानात मतदानाची टक्केवारी वाढली असून ५८.५१ टक्के इतके मतदान झाले.
मुंबई- मुंबई पश्चिम उपनगरातील तीन केंद्रांवर रविवारी झालेल्या फेरमतदानात मतदानाची टक्केवारी वाढली असून ५८.५१ टक्के इतके मतदान झाले.
पूर्वी झालेल्या मतदानात येथील आकडा ४३ टक्क्यांच्या आसपास होता. या तीन मतदान केंद्रांवरील एकूण २ हजार ५१७ मतदारांपैकी १ हजार २३२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ६६८ पुरुष मतदारांनी तर ५६४ महिला मतदारांनी आपला हक्क बजावल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी दिली.
काही तांत्रिक कारणामुळे या तीन मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले. या तीन मतदान केंद्रांपैकी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रांतर्गत येणा-या मतदान केंद्र क्रमांक २४२ वर एकूण ३५१ मतदारांनी मतदान केले. त्यात २०० पुरुष मतदार तर १५१ महिला मतदारांनी मतदान केले.
या भागातील एकूण मतदानाची टक्केवारी ३५.४१ एवढी आहे. याच लोकसभा मतदारसंघातील १६१ चारकोप विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २४३ वर एकूण ६२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष मतदारांची संख्या ३०५ तर महिला मतदारांची संख्या ३१७ एवढी आहे. येथील टक्केवारी ५८.५१ टक्के नोंदवली गेली.
२९ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील १६८ चांदिवली विधानसभा मतदारसंघात येणा-या मतदान केंद्र क्रमांक १६० वर एकूण मतदारांपैकी २५९ मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ५५.९३ एवढी आहे. या केंद्रावर मतदान करणा-या पुरुषांची संख्या १६३ तर महिला मतदारांची संख्या ९६ एवढी आहे.