डबेवाल्यांच्या जीवनावर आधारित ‘टीना अँड टिफिन’ हे कॉमिक्स येत्या २२ डिसेंबर रोजी गोरेगाव येथील कॉमिक्सप्रेमी मेळाव्यात सर्व लहान मुलांना देण्यात येणार आहे.
मुंबई – घडय़ाळाच्या काटय़ावर धावणा-या मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवणा-या डबेवाल्यांची महती सातासमुद्रापार पोहोचली आणि मुंबईकरांची मान अभिमानाने उंचावली. या डबेवाल्यांची लहान मुलांनाही माहिती मिळावी यासाठी त्यांना कॉमिक्समार्फत मुलांसमोर आणण्यात येत आहे. डबेवाल्यांच्या जीवनावर आधारित ‘टीना अँड टिफिन’ हे कॉमिक्स येत्या २२ डिसेंबर रोजी गोरेगाव येथील कॉमिक्सप्रेमी मेळाव्यात सर्व लहान मुलांना देण्यात येणार आहे.
डबेवाल्यांचे वेळेचे अचूक गणित, त्यांची होणारी धावपळ एकंदरीतच त्यांचे जीवन लहानांपासून मोठय़ांपर्यंत कौतुकाचा विषय आहे. यांचे हे आयुष्य मुलांना सहजरीत्या कळावे यासाठी ‘टीना अँड टिफिन’ हे कॉमिक्स तयार करण्यात आले आहे. या कॉमिक्समागील संकल्पना ‘मुंबई जेवण डबेवाला मंडळा’चे सचिव गंगाराम तळेकरांची आहे. नुकतेच लंडन येथील ‘टिफिन बाइट्स’ या उपाहारगृहाच्या प्रोमोशनसाठी गंगाराम तळेकर यांच्यासह मुंबईच्या डबेवाल्यांपैकी काही मंडळी तेथे गेली होती. जमाल इरानी या भारतीयाने सुरू केलेल्या टिफिन बाइट्स या उपाहारगृहाच्या पाचव्या शाखेच्या प्रसिद्धीसाठी तळेकरांसह डबेवाली मंडळी पांढराशुभ्र झब्बा, पायजमा आणि डोक्यावर डब्याची चळत घेऊन लंडनच्या बँक स्ट्रीटवर फिरत होते. या वेळी एका लहान मुलाने डबेवाल्यांबाबत आपल्या आईला विचारणा केली. योगायोगाने प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाला हेच डबेवाले उपस्थित असल्याचे त्या महिलेला लक्षात आल्याने तिने त्याला डबेवाल्यांबाबत सविस्तर माहिती दिली. यातूनच तळेकर यांनी भारतात परतल्यावर लहान मुलांना कॉमिक्सच्या माध्यमातून डबेवाल्यांची माहिती देण्याचा निर्णय घेतला.
भारतात परतल्यानंतर तळेकर यांनी यासंदर्भातील आपले विचार डबेवाल्यांच्या जीवनावर पी. एचडी. करणा-या डॉ. पवन अग्रवाल यांना सांगितले. अग्रवाल यांनी ही संकल्पना उचलून ‘टीना अँण्ड टिफिन’ हे कॉमिक्स तयार केले. या पुस्तकात टीना या शालेय मुलीला डबेवाल्यांविषयी असलेली जिज्ञासा शाळेत भेटीसाठी आलेल्या पवन अग्रवाल यांच्या संवादातून मांडण्यात आली आहे. हे कॉमिक्स खास लहान मुलांना नजरेसमोर ठेवून बनवण्यात आल्याचे डबेवाल्यांचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. मुंबई व राज्यातील लहान मुलांना अशी जवळपास दहा लाख कॉमिक्स देण्याचा संकल्प
डॉ. अग्रवाल यांनी केला आहे.