सलग पाच सामने जिंकलेल्या रोहितच्या मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर सातत्य राखताना विजयी ‘षटकार’ ठोकण्याचा निर्धार केला आहे.
मुंबई- माजी विजेता मुंबई इंडियन्स आयपीएलच्या दहाव्या आवृत्तीत शनिवारी (२२ एप्रिल) दुस-या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सशी दोन हात करेल. सलग पाच सामने जिंकलेल्या रोहितच्या संघाने घरच्या मैदानावर सातत्य राखताना विजयी ‘षटकार’ ठोकण्याचा निर्धार केला आहे.
मुंबईने सहापैकी पाच सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. माजी विजेते जबरदस्त फॉर्मात आहे. खराब सुरुवातीनंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. एक-दोन नव्हे तर मुंबईने सलग पाच सामने जिंकलेत. यंदाच्या हंगामातील हा विक्रम आहे. वानखेडे स्टेडियमवर शनिवारी विक्रमात आणखी भर घालण्यादृष्टीने यजमान मैदानावर उतरतील. प्रतिस्पर्धी दिल्लीला पाच सामन्यांतून केवळ दोन सामने जिंकता आलेत. तीन पैकी दोन पराभव सलग आहेत. म्हणजेच झहीर खान आणि कंपनीसमोर पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचे आव्हान आहे.
दमदार फलंदाजी हे मुंबईच्या सवरेत्कृष्ट कामगिरीचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले आहे. आघाडीच्या फळीतील नितीश राणा भलताच फॉर्मात आहे. त्याच्या उपयुक्त योगदानामुळे मुंबईची आघाडी फळी मजबूत झाली आहे. राणासह जोस बटलर आणि पार्थिव पटेलने फलंदाजीत चांगले योगदान दिले आहे. फलंदाजी चांगली होत असली तरी कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मची चिंता मुंबईला भेडसावत आहे. अष्टपैलू किरॉन पोलार्डही एकदाच ‘क्लिक’ झाला. दिल्लीविरुद्ध रोहितला सूर गवसेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना वाटते. यजमानांची गोलंदाजी तितकी प्रभावी नसली तरी वाईटही नाही. मध्यमगती गोलंदाज मिचेल मॅकक्लेनॅघनने ब-यापैकी अचूक गोलंदाजी केलीय. हार्दिक पंडय़ा आणि जसप्रीत बुमरा या युवा मध्यमगती दुकलीनेही प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणले आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्रमुख फलंदाजांनी हरवलेय. कसोटीपटू करुण नायर ‘फ्लॉप’ ठरला आहे. केवळ संजू सॅमसनने छाप पाडली आहे. श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि सॅम बिलिंग्जने थोडी चमक दाखवली तरी सातत्य नाही. पाहुण्यांची गोलंदाजी प्रभावी ठरतेय. विशेष करून मध्यमगती गोलंदाज ख्रिस मॉरिस. त्याने ५ सामन्यांत १२ विकेट घेतल्यात. कर्णधार झहीर आणि पॅट कमिन्स (७ विकेट) चालताहेत. मात्र खराब फलंदाजीमुळे त्यांच्या चांगल्या कामगिरीवर पाणी फेरले जात आहे. मुंबई फॉर्मात असल्याने दिल्लीसमोर त्यांना रोखण्याचे मोठे आव्हान आहे.
मुंबईच्या उंचावलेल्या कामगिरीत तिस-या क्रमांकावर फलंदाजीला येणा-या नितीश राणाचे मोठे योगदान आहे. त्याने ६ सामन्यांत ५१.००च्या सरासरीने २५५ धावा ठोकल्यात. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
राणादाने अप्रतिम सातत्य राखले आहे. त्याने ३४, ५०, ४५, ११, ५३ आणि नाबाद ६२ अशी चमकदार फलंदाजी केलीय. केवळ एकदा तो लवकर बाद झाला. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळूनही राणादा नवखा वाटत नाही.
दिल्लीच्या या २३ वर्षीय फलंदाजाने किंग्ज इलेवन पंजाबविरुद्ध अशी काही फलंदाजी केलीय की, प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कुठे चेंडू टाकावा, तेच कळत नव्हते.
अवघ्या ३४ चेंडूंत त्याने ६४ धावांची नाबाद खेळी केली. त्यात सात उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. या षटकारांमुळे त्याने स्पर्धेतील वैयक्तिक षटकारांची संख्या १६वर नेली.
आयपीएल-१०मध्ये गुरुवारपर्यंत ‘सिक्स’ मारण्यात तोच आघाडीवर होता.