घडाळ्याच्या काटय़ावर धावणा-या मुंबईकरांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एक खुशखबर आहे.
मुंबई – घडाळ्याच्या काटय़ावर धावणा-या मुंबईकरांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एक खुशखबर आहे. मोनो, मेट्रो, बस, रेल्वेने सातत्याने प्रवास करणा-यांचा प्रवास लवकरच ‘स्मार्ट’ होणार आहे. या सर्व वाहतूक सेवेतून प्रवास करताना प्रवाशांना वेगवेगळे पास, स्मार्ट कार्ड जवळ बाळगावे लागतात. प्रवाशांचा हा त्रास कमी व्हावा, यासाठी एमएमआरडीएद्वारे एकत्रित तिकीट पद्धतची योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड बनवण्यात येणार असून प्रवाशांना या एकाच कार्डद्वारे विविध वाहतूक सेवेतून प्रवास करणे शक्य होईल.
एकत्रित तिकीट पद्धतीची योजना राबवण्यासाठी एमएमआरडीएद्वारे सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा, तिकीट पद्धती याबाबत यापूर्वी पूर्ण करण्यात आलेला अभ्यास, अहवाल यांचा आढावा घेणे, एकत्रित तिकीट पद्धतीची बांधणी, तंत्र यांना अंतिम स्वरूप देणे, निविदा प्रक्रिया हाताळणे आणि योजनेची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करणे अशा विविध जबाबदा-या सल्लागारांना पार पाडाव्या लागतील.
मुंबई हे घाईगर्दीचे शहर आहे. रोजच्या धावपळीत सार्वजनिक वाहतूक सेवेतून प्रवास करताना होणारा वेळेचा अपव्यय एकत्रित तिकीट पद्धतीमुळे टाळता येईल. तसेच प्रवास सुसह्य होईल. विविध प्रकारच्या वाहतुकीसाठी उपयुक्त अशा या योजनेमुळे प्रवाशांच्या रांगेत उभे राहण्याचा त्रासही वाचेल.
– दिलीप कवठकर, सहप्रकल्प संचालक, एमएमआरडीए