निवडणूक आयोगाने भाजपचे ज्य़ेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना आचारसंहितेबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने भाजपचे ज्य़ेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना आचारसंहितेबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत मुंडे यांनी आपल्या निवडणूक खर्चाबाबत एका सार्वजनिक कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत मुंडे यांनी २० दिवसांत स्पष्टीकरण द्यावे असे आयोगाने नोटीशीत म्हटले आहे.
मुंबईत विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मुंडे यांनी निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्चाची ४० लाख ही मर्यादा तूटपूंजी आहे. मागील निवडणूकीत आपले आठ कोटी रुपये खर्च झाले होते, असे म्हटले होते. वास्तविक, गेल्या निवडणूकीत मुंडे यांनी १९,३६,९९२ रुपये खर्च झाल्याचे आयोगाला सांगितले होते.
मुंडे यांच्या या वादग्रस्त विधानाच्या भाषणाची सीडी पाहिल्यानंतरच निवडणूक आयोगाने मुंडे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १० अ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत स्पष्टीकरण न दिल्यास मुंडे लोकसभा,विधानसभा आणि विधान परिषद सदस्यत्वासाठी पुढील तीन वर्षे अपात्र ठराल असा इशारा आयोगाने दिला आहे.दरम्यान, मुंडे यांच्या विधानाची आयोगाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी केली आहे.