देशाविरोधी घोषणा देणारा उमर खालीद पुन्हा जेएनयूमध्ये परतला असून, त्याने ‘माय नेम इज खालिद, आय एम नॉट टेररिस्ट‘ असे म्हटले आहे.
नवी दिल्ली- दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) देशाविरोधी घोषणा देणारा उमर खालीद पुन्हा जेएनयूमध्ये परतला असून, त्याने ‘माय नेम इज खालिद, आय एम नॉट टेररिस्ट‘ असे म्हटले आहे. तो रविवारी उशिरा रात्री जेएनयूच्या कॅम्पसमध्ये आला. त्याच्याबरोबर आणखी पाच विद्यार्थी आले.
आशुतोष कुमार, अनंत प्रकाश नारायण, रामा नागा आणि अनिर्बान भट्टाचार्य अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. १२ फेब्रुवारीपासून जेएनयूमधील हे पाचही विद्यार्थी फरार होते.
खालिद कॅम्पसमध्ये आल्यानंतर घोषणा देऊन त्याचे स्वागत केले. त्याने त्यानंतर जेएनयूच्या विद्यार्थ्यांसमोर आणि शिक्षकांसमोर भाषण केले. यावेळी त्याने आपल्याबद्दल कसा अपप्रचार केला जात आहे, ते सांगितले.
‘मी उमर खालिद आहे, पण मी दहशतवादी नाही. माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत, मी कधीही पाकिस्तानला गेलेलो नाही, माझ्याकडे पासपोर्टही नाही. माझ्यावर पाकिस्तान, बांगलादेश, काश्मीरमध्ये ८००हून अधिक फोन केल्याचा आरोप आहे, पण तो आरोप निराधार आहे, पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाही, असे तो म्हणाला. कोणतिही खातरजमा न करता मिडियाने या सगळ्याला प्रसिद्धी दिल्याने त्यांना बेजबाबदारीचे परिणाम भोगावे लागतील, असेही तो म्हणाला.