पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतरही योगेंद्र यादव हे स्वत:ला आम आदमी पक्षाचा एक भाग असल्याचे समजत आहेत.
बंगळूरु – पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतरही योगेंद्र यादव हे स्वत:ला ‘आम आदमी पक्षा’चा एक भाग असल्याचे समजत आहेत. आपल्याला पक्षातून काढून टाकण्यात आले याबाबतचा कोणताही अधिकृत संवाद झाला नसल्याने आपण अजूनही या पक्षाचा एक भाग असल्याचे योगेंद्र यादव यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आठवड्याभरापूर्वी, पत्रकार परिषदेदरम्यान, प्रशांत भूषणजी, मी, आनंद कुमार आणि अजित झा यांना पक्षाच्या सदस्यपदावरुन काढून टाकण्यात येत असल्याची घोषणा पक्षाने केली होती. मात्र अद्याप त्याबाबत अधिकृत माहिती मला माझ्याकडे आलेली नाही असे यादव म्हणाले. मला पक्षातून काढण्यात आले हे मला प्रसारमाध्यमांकडूनच समजले असेही यादव यांनी सांगितले.
तुम्ही अजूनही पक्षाचा एक भाग आहात का असे योगेंद्र यांना विचारले असता ते म्हणाले, मी अजूनही या चळवळीचा एक भाग आहे. हा पक्ष नाही तर ही एक चळवळ आहे आणि या चळवळीला तात्पुरता पक्षाचे स्वरुप आले आहे. मी पक्षासोबतच आहे, असे यादव म्हणाले.
पक्षाविरोधी कारवाया केल्याप्रकऱणी २० एप्रिल रोजी प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार आणि अजित झा यांची ‘आप’मधून हकालपट्टी करण्यात आली होती.