मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी कंत्राटदारासह अधिकारींवर कारवाई केल्यानंतर आता मीरा भाईंदरच्या नालेसफाईच्या कामाबाबतही चौकशी व्हावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेनी केली आहे.
भाईंदर- नालेसफाईच्या कामात महापालिकेची कंत्राटदाराने फसवणूक केल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी कंत्राटदारासह अधिकारींवर कारवाई केल्यानंतर आता मीरा भाईंदरच्या नालेसफाईच्या कामाबाबतही चौकशी व्हावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेनी केली आहे. या कारवाईबाबत आयुक्तांनी पावले उचलावी अन्यथा आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
मीरा-भाईंदर शहरातील नाले सफाई पावसाळा तोंडावर आल्या नंतर महापालिकेने १८ मे रोजी सुरू केली होती. शहरातील साफसफाईच्या वार्षकि कामाचा ५० कोटी रुपयांचा ठेका एका कंपनीला देण्यात आला होता. त्यात नालेसफाईचाही समावेश होता. असे असतानाही मान्सूनपूर्व नालेसफाईचा दीड कोटींचा ठेका काढण्यात आला.
शहरात लहान मोठे १५३ नाले आहेत. त्यांच्या सफाईसाठी महापालिकेने १ कोटी ६२ लाख रुपये निधी प्रस्तावित केला होता. स्थायी समितीने १ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली.
शहरात सहा प्रभाग असून प्रभाग १ ते तीनसाठी एम.ई. प्रोजेक्टर प्रा,ली. तर ४ ते ६ साठी आशापुरा कंस्ट्रशन यांना काम देण्यात आले होते. नाले सफाईसाठी ७ पोकल्न मशीन, ३ बोट पोकलेन, ४ हायड्रो मशीन, २ क्रेन, १२ जेसीबी, ३० डंपर, चारशे सफाई कामगार, असा ताफा तसेच साधारण २५० ते ३०० रुपये प्रतिदिन मजुरीमध्ये उपलब्ध असणा-या मजुरांसाठी महापालिकेने प्रतिदिन ६२६ रुपये मजुरीला मंजुरी दिली होती. पालिकेचे ६ स्वछता निरीक्षक नालेसफाईवर देखरेख ठेवणार होते. तसेच उपायुक्तांमार्फत आयुक्तांना रोज अहवाल दिला जाणार होता.
कागदोपत्री असे होते तरी स्वछता निरीक्षकांचा सहभाग कामात कुठेच दिसला नाही. रस्त्यावरील नाल्यातून काढलेली घाण भर रस्त्यावर टाकून ठेवली होती.
गाळकचरा घेऊन जाणारी ३० डंपर कुठे गेले, हा प्रश्न होता. नालेसफाईनंतरही पावसाळ्यात शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. तसेच दीड कोटी रुपयांचे टेंडर असताना महापालिकेने ठेकेदाराला तब्बल १२ कोटी रुपये वाढवून देऊन साडेतेरा कोटी रुपये दिले.
म्हणून पालिका अधिकारी तसेच आशापुरा कंस्ट्रक्शन कं. आणि एम.ई. प्रोजेक्ट प्रा.ली. या दोन्ही ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमान संघटनेचे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष संदीप राणे यांनी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.