‘गाव तेथे एसटी’ या तत्त्वावर एसटी महामंडळाकडून माथेरानमध्ये मिनी बस सुरू करण्यात आल्या आहेत.
कर्जत- ‘गाव तेथे एसटी’ या तत्त्वावर एसटी महामंडळाकडून माथेरानमध्ये मिनी बस सुरू करण्यात आल्या आहेत. या मिनीबसमुळे पर्यटक आणि स्थानिकांचीही सोय होत होती, मात्र अल्पावधीतच या मिनी बस माथेरानचा घाट चढण्यात अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी दुपारीही कर्जतहून सुटलेली मिनीबस घाटाच्या मध्यावर जाऊन बंद पडल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ७-८ वेळा प्रयत्न करूनही बस घाट चढेनाशी झाल्याने अखेर काही विद्यार्थी आणि प्रवाशांना उतरवून बस दस्तुरी नाक्यापर्यंत नेण्यात आली. असे प्रकार या मार्गावर मिनी बस सुरू झाल्यापासून कित्येक वेळा घडले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने विषाची परीक्षा घेण्यापेक्षा या मार्गावर दुस-या कंपनीच्या बस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशी आणि पर्यटकांकडून होत आहे.
मिनी बस सुरू केल्यामुळे एसटी महामंडळाला टॅक्सीचालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या मिनीबसमुळे पर्यटक आणि स्थानिकांची मात्र चांगली सोय झाली असली तरी याच बस आता अपघाताला कारण ठरू शकतील, या भीतीने पर्यटक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
माथेरानचा घाट चढताना या मिनी बसची पॉवर कमी पडत असल्याचे समोर आले होते. याला पर्याय म्हणून आयशर आणि टाटा लेलँड कंपनीच्या मिनी बसही या मार्गावर चालवण्यात आल्या होत्या, मात्र हा प्रयत्नही फोल गेला होता. त्यामुळे या मार्गावर दुस-या बस आणल्या जाव्यात, यासाठी माथेरानकर प्रयत्नशील आहेत. एसटी आगार व्यवस्थापकांकडूनही वारंवार तसे आश्वासन मिळते, मात्र काही कालावधी लोटताच, हे आश्वासनही हवेत विरते.
दरम्यान, विषाची परीक्षा घेऊन अपघाताला कारण ठरण्याआधी एसटी महामंडळाने या मार्गावर चांगल्या बस आणाव्यात, अशी मागणी मंगळवारच्या घटनेनंतर पर्यटक आणि माथेरानकरांनी केली आहे.