लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन जादा भार वाहू शकत नाहीत.
माथेरान – लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन जादा भार वाहू शकत नाहीत. त्यामुळे या ट्रेनला गेल्या महिन्यापासून प्रथम श्रेणीचे डबे लावले जात नाहीत. अधिक उत्पन्न मिळवून देणारे प्रथम वर्गाचे डबे न लावल्याने मध्य रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
गेल्या १०० वर्षापासून धावणारी नेरळ-माथेरान मार्गावर धावणा-या ‘मिनी ट्रेन’ला सहा प्रवासी डबे असतात. त्यात दुस-या श्रेणीचे चार, प्रथम श्रेणीचा एक आणि मालवाहू तसेच गार्डच्या डब्याचा समावेश आहे. मात्र इंजिन सर्व प्रवासी डबे ओढत नाही, म्हणून गेल्या काही दिवसांपासून मिनीट्रेन प्रथम श्रेणी डब्याविना धावत आहे. मध्य रेल्वेच्या नेरळ लोकोमधील कर्मचारी वर्गाने सांगितले की, सध्याच्या मिनीट्रेनच्या इंजिनाची जादा वजन वाहून नेण्याची क्षमता नाही. त्यातच इंजिन दुरुस्त केल्यानंतर प्रथम दर्जाचा डबा लावलेली मिनीट्रेनने आपली फेरी अर्धवटच सोडली. त्यामुळे मिनीट्रेनला प्रथम दर्जाचा डबा लावणे बंद केले . या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. प्रथम दर्जाच्या डब्यात जास्तीत जास्त बावीस आणि कमीतकमी वीस प्रवासी बसू शकतात. या डब्यातून प्रवास करण्यासाठी अडीचशे रुपये एका तिकिटासाठी मोजावे लागतात.
नेरळ – माथेरान हा मार्ग तोटय़ात असताना,आता प्रथम दर्जाचे डबे लावले जात नसल्याने, रेल्वेच्या नुकसानीत भर पडत आहे. प्रथम श्रेणीचा डबा नसल्याने कमी प्रवासी घेऊनच मिनीट्रेन प्रवास करीत आहे. पूर्वी मिनीट्रेनच्या एका फेरीतून जास्तीत जास्त १५० आणि कमीत कमी १४० प्रवासी प्रवास करायचे. आता ही प्रवासी संख्या १२० पर्यंत घडली आहे.
नेरळ-माथेरान मिनीट्रेनला जोडण्यात येणारे प्रवाशी डबे हे लोकोमधील कोच विभाग पाहत असतो. प्रथम श्रेणीचे डबे लावण्याची जबाबदारी पूर्णपणे लोकोमधील कोच विभागाची आहे. त्यामुळे प्रथम श्रेणी डबे न लावण्याचे कारण तोच विभाग सांगू शकतो.- अश्विनीकुमार, स्टेशन उपप्रबंधक, नेरळ-माथेरान ट्रेन