मिठबांव तांबळडेग किना-यावर ब्लू व्हेल मासा आढळून आला आहे. हा सर्वात मोठा मासा असल्याने पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.
मिठबांव- मिठबांव तांबळडेग किना-यावर ब्लू व्हेल मासा आढळून आला आहे. हा सर्वात मोठा मासा असल्याने पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. हत्तीपेक्षाही ब्लू व्हेल मोठा असल्याने त्याला पृथ्वीतलावरील सर्वात मोठा प्राणी म्हणून ओळखले जाते. या माशाचा मृत्यू नैसर्गिक असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र हल्ली ब्लू व्हेल मोठय़ा प्रमाणात मृतावस्थेत समुद्रकिना-याला आढळू लागले आहेत.
ब्लू व्हेल मासा हा फार खोल समुद्रात राहतो. मिठबांव तांबळडेग किनारपट्टीवर येण्याआधी किमान तीन दिवस आधी त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास आहे. कारण त्यांच्या शेपटीकडील भाग नाहीसा झाला आहे. हे मासे राखाडी व निळसर रंगाचे असतात. ब्लू व्हेल हा सस्तन प्राणी आहे व त्याला श्वासोछ्वासासाठी पाण्यातून बाहेर यावे लागते. हा मासा उंच उडी मारून श्वास घेतो व पुन्हा तळाला जातो. या माशाला सर्वात मोठा धोका माणसापासून आहे. या प्राण्याला समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागत असावे. त्याचा सुगावा शिका-यांना ताबडतोब लागतो. या माशाची खबर मिळूनही वनविभागाने त्याची दखल घेतली नव्हती. हा मासा आता सडू लागल्याने परिसरात दिवसेंदिवस दरुगधी पसरत आहे.