आचारसंहितेबाबत निवडणूक आयोगाची करडी नजर असून आता विधानसभा मतदार संघामध्ये अतिरिक्त व्हीडिओ सर्वेलन्स पथक तयार करण्यात आले आहे.
मुंबई – माहीम, धारावी आणि शीव-कोळीवाडा या तीन मतदारसंघांतील उमेदवारांकडून केलेल्या जाणा-या खर्चावर तसेच आचारसंहितेबाबत निवडणूक आयोगाची करडी नजर असून आता विधानसभा मतदार संघामध्ये अतिरिक्त व्हीडिओ सर्वेलन्स पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या प्रचारसभा, मिरवणुका, कोपरा सभा, मेळावे इत्यादींचे जास्तीत जास्त चित्रीकरण करून या सर्व खर्चाच्या बाबींची नोंद ठेवण्यात येणार आहे.
दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघातील माहीम, धारावी आणि शीव-कोळीवाडा तीन मतदारसंघांचे निवडणूक खर्च निरीक्षक व्ही. के. तिवारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक खर्च निरीक्षक यांची शुक्रवारी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन व निवडणूक उमेदवारांच्या खर्चाचे नियंत्रण याबाबत सविस्तर चर्चा केली. सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी व निवडणूक शांतपणे पार पडावी या दृष्टीने निवडणूक यंत्रणेने काम करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिका-यांनी यावेळी केल्या.
वृत्तपत्र व टीव्ही चॅनेल व प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध होणा-या पेड न्यूजवर नजर ठेवण्यात यावी आणि मोठय़ा प्रमाणात होणारे आर्थिक व्यवहार, मद्यसाठा वाहतूक व विक्री यावर नियंत्रण ठेवावे यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाची जागा बदलून तपासणी करावी, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक खर्च निरीक्षक यांनी दिल्या.
तसेच या तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारांकडून जास्त खर्च होत असेल,आचारसंहितेचा भंग होत असेल किंवा गैरप्रकार होत असेल तर ८८७९९१३९१६ या भ्रमणध्वनीव संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.