पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात कुमक तैनात केल्याने शनिवारी संध्याकाळी परिस्थिती नियंत्रणात आली.
मालेगाव- सफाई कर्मचा-याने अत्याचार करून पाच वर्षीय मुलीची हत्या केल्याची अफवा पसरल्याने आझादनगर भागातील एका प्राथमिक शाळेची इमारत तसेच पोलिसांची वाहने शुक्रवारी जमावाने पेटवली. अत्याचार करणा-या संशयितास ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने सायंकाळी उशिरापर्यंत शाळा परिसरात ठाण मांडल्याने शहराच्या पूर्व भागात तणाव निर्माण झाला होता; मात्र पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात कुमक तैनात केल्याने शनिवारी संध्याकाळी परिस्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान, संबंधित मुलीचा विनयभंग झाल्याचे पोलिसांनी मान्य केले; परंतु ती जिवंत असल्याचा खुलासा करत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. या घटनेनंतर जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेत शहरात मोठा फौजफाटा तैनात केला.
आयेशानगर भागात खातून एज्युकेशन संस्था संचलित मदर आयेशा प्राथमिक व पूर्व प्राथमिक ऊर्दू शाळा आहे. या शाळेत शिक्षणा-या मुलीचा बुधवारी एका सफाई कर्मचा-याने विनयभंग केला. भेदरलेल्या मुलीने पालकांना ही माहिती दिली. शुक्रवारी संतप्त पालक जाब विचारण्यासाठी शाळेत पोहोचले; मात्र तेथे व्यवस्थापनाशी त्यांचा वाद झाला. दरम्यानच्या काळात संबंधित शाळेतील मुलीवर अत्याचार करून हत्या झाल्याची अफवा शहरात पसरली. त्यामुळे दुपारी दोनच्या सुमारास मोठा जमाव परिसरात जमला. जमावाने शाळेच्या इमारतीवर दगडफेक सुरू केली. अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे फौज फाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलीस बळाच्या तुलनेत जमाव अधिक संख्येने असल्याने पोलिसांनी काहीशी संयमाची भूमिका घेतली; मात्र जमाव अधिकच हिंसक झाला. प्रसंगावधान राखून पोलिसांनी शाळेचे कर्मचारी व शिक्षकांना सुरक्षित बाहेर काढले. या वेळी जमावाने शाळेतील फर्निचर, कागदपत्रे, संगणक तसेच इमारतीला आग लावली होती.
[EPSB]
मालेगावात तोडफोड आणि जाळपोळ
मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या रागातून संतप्त जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली.
[/EPSB]