मालकाला शस्त्राचा धाक दाखवून तब्बल सव्वा कोटी रुपयांना लुटणा-या नोकराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बिहारमधून अटक केली.
मुंबई – मालकाला शस्त्राचा धाक दाखवून तब्बल सव्वा कोटी रुपयांना लुटणा-या नोकराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बिहारमधून अटक केली. आरोपी मलबार हिल येथे एका रहिवाशाच्या फ्लॅटमध्ये नोकर म्हणून कामाला होता.
बिटकारे पंडित ऊर्फ अजय ऊर्फ राजू असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली. मलबार येथील गार्डन व्ह्यू येथील सुरेशभाई शहा यांच्याकडे राजू कामाला होता. १२ डिसेंबर रोजी शहा यांची पत्नी स्मिता (६५) घरी एकटीच असताना राजूने त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते.
राजूने स्मिता यांचे हातपाय बांधून त्यांना बाथरूममध्ये डांबून ठेवले होते. या प्रकरणी राजू याला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने सुनील यादव आणि आशीष कामत यांच्या मदतीने हा कट रचल्याची कबुली दिली. अधिक तपासासाठी राजू याला मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.