अमनलॉज ते माथेरानदरम्यान शनिवारपासून सुरू केलेल्या शटल सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला
मुंबई – अमनलॉज ते माथेरानदरम्यान शनिवारपासून सुरू केलेल्या शटल सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवारी आणि रविवारी द्वितीय श्रेणीच्या एकूण ९७४ तिकिटांची विक्री झाली तर प्रथम आणि द्वितीय श्रेणी मिळून एकूण ४७ हजार ९९३ रुपयांची तिकीट विक्री झाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले.
या शटल सेवेला प्रवाशांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून विकेंड आणि सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी पाचपेक्षा अधिक फे-या सुरू ठेवण्याचे आदेश अमनलॉज स्थानकाच्या स्थानक व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी ‘प्रहार’ला दिली.
मध्य रेल्वेचे मुख्य परिचालन व्यवस्थापक झेड. ए. सिद्दिकी शनिवारी निवृत्त झाले. त्यांच्या हस्ते या शटल सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. अमनलॉज ते माथेरान प्रवासासाठी फक्त १३ मिनिटांचा अवधी लागतो. शटलचा वेग ताशी १२ किमी असून, या मार्गावर पहिली गाडी चालवण्याचा मान वरिष्ठ लोको पायलट राजाराम खडे यांना मिळाला.
ही सेवा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रथम श्रेणीच्या ५३ आणि द्वितीय श्रेणीच्या ३४५ तिकिटांची विक्री झाली. रविवारी प्रथम श्रेणीच्या तिकीट विक्रीत घट तर द्वितीय श्रेणीच्या तिकीट विक्रीत लक्षणीय वाढ झाली. रविवारी प्रथम श्रेणीची फक्त १७ आणि द्वितीय श्रेणीची ६२९ तिकिटे विकली गेली. शनिवारी २५ हजार ७५ रुपये आणि रविवारी २२ हजार ९१९ रुपयांची तिकीट विक्री झाल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.