नेरळहून माथेरानला निघालेल्या माथेरानच्या मिनी ट्रेनला जुम्मापट्टी स्थानकावर रविवारी दुपारी अपघात झाला.
माथेरान- नेरळहून माथेरानला निघालेल्या माथेरानच्या मिनी ट्रेनला जुम्मापट्टी स्थानकावर रविवारी दुपारी अपघात झाला. जुम्मापट्टी स्थानकावर रेल्वे रुळावर तेल सांडल्यामुळे मिनी ट्रेन मागे मागे जात दरीच्या दिशेला सरकून थांब्यावर आदळली.
नेरळहून एनडीएम ५०१ क्रमांकाचे इंजिन लावलेली मिनी ट्रेन १२ वाजून १० मिनिटांनी माथेरानसाठी रवाना झाली. ही ट्रेन जुम्मापट्टी स्थानकावर आल्यानंतर तिच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला.
त्यामुळे ही ट्रेन जुम्मापट्टी स्थानकावर काही वेळ थांबवून ठेवली होती. त्यावेळी रुळावर सांडलेल्या तेलामुळे मिनी ट्रेनची चाके तेलामुळे घसरून प्रवाशांनी भरलेली मिनी ट्रेन दरीच्या दिशेने मागे सरकू लागली.
‘मिनी ट्रेन’च्या चालकाने ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. सुदैवाने ती दरीच्या किना-यावर असलेल्या थांब्यावर आदळली. दरम्यान, ही ट्रेन मागे सरकत असताना प्रवाशांनी उडया मारल्या.
या ट्रेनमध्ये १५०हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. या घटनेबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी दाखवत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. त्यांनी माथेरानहून नेरळला जाणारी ट्रेन अडवून ठेवली. काही वेळानंतर पोलीस आल्यानंतर माथेरान-नेरळ ट्रेन सोडण्यात आली. अपघातग्रस्त मिनी ट्रेनमधील प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत देण्यात आले. तसेच पर्यटकांना खासगी वाहनातून माथेरानला पाठवण्यात आले.
माथेरानच्या मिनी ट्रेनला वारंवार अपघात होत आहेत. या घटनांकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे नेहमीच दिसत आहे. मात्र आजची घटना खूपच गंभीर होती. ही ट्रेन थांब्यावर आदळून थांबली नसती तर खूप मोठा अपघात होण्याची शक्यता होती.