ऐतिहासिक नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे जुने डबे रेल्वे प्रशासनाने भंगारात काढले आहेत. नेरळ लोकोशेडच्या अबाहेर सध्या या ३० वर्ष जुन्या ९ डब्यांचे भाग बेगळे करण्यात येत आहेत.
नेरळ- ऐतिहासिक नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे जुने डबे रेल्वे प्रशासनाने भंगारात काढले आहेत. नेरळ लोकोशेडच्या अबाहेर सध्या या ३० वर्ष जुन्या ९ डब्यांचे भाग बेगळे करण्यात येत आहेत. मात्र हे डब्ब्यांशी अनेक प्रवाश्यांच्या आठवणी जोडलेल्या असल्याने त्यांनी हे डब्बे नामशेष होताना पाहून हळहळ व्यक्त केली आहे.
१०० वर्षापेक्षाही जास्त काळाहून सुरू असलेल्या या मिनीट्रेनमध्ये आजवरच्या वाटचालीत अनेक बदल करण्यात आले आहेत. पूर्वी मिनीट्रेन वाफेच्या इंजिनावर धावत असताना रेल्वे मार्गाच्या आजूबाजुचा परिसर जळत असे. त्यामुळे पुढे हे इंजिन बदलून त्याजागी डिझेलचे इंजिन आले.
त्यात अलिकडच्या काळापर्यंत या मिनीट्रेनला १९७०-८० च्या दशकातील डब्बे वापरले जात होते. कालांतराने नवे डब्बे आल्यानंतर हे ९ डब्बे काढून ठेवण्यात आले. यात त्या डब्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यामुले रेल्वेने हे ९ डब्बे स्क्रॅपमध्ये (भंगारात) काढण्याचा निर्णय घेतला.
मात्र हे डब्बे जसेच्या तसे उचलून नेणे शक्य नसल्याने सध्या त्यांचे भाग वेगळे केले जात आहेत. मात्र रेल्वेने हे डब्बे भंगारात विकण्याऐवजी त्यातील काही डब्बे संग्रही ठेवले असते, तर पर्यटकांनाही ते पाहता आले असते, शिवाय या मार्गावरील प्रवाश्यांच्या आठवणीही पुसल्या गेल्या नसत्या, असा सूर प्रवाश्यांमधून उमटत आहे.
बदलत्या काळानुसार आपण नवे बदल स्विकारत असलो, तरी अनेक जुन्या गोष्टी आपल्याला हव्याहव्याशा वाटत असतात. मिनीट्रेनचे जुने डब्बे रेल्वेने भंगारात काढल्याने ते आता विस्मृतीत गेले आहेत. मात्र माझ्यासारख्या अनेक पर्यटकांच्या ते कायम स्मरणात राहतील.
– तुलसी पाटील, पर्यटक, नवी मुंबई.
मिनीट्रेनमधून कधीही प्रवास करताना मला तो पहिलाच प्रवास वाटतो. दरवेळी मिनीट्रेनचा फिल वेगळा असतो. मात्र तरीही जुने डब्बे भंगारात न काढता ते मिनीट्रेनच्या इंजिनांप्रमाणे संग्रही ठेवायला हवे होते.
– अर्चना जोगळे-राऊत, पर्यटक, नालासोपारा.