मुंबईपासून सर्वाधिक जवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणा-या पर्यटकांच्या सेवेत नेरळ-माथेरान घाटरस्ता सज्ज झाला आहे.
माथेरान- मुंबईपासून सर्वाधिक जवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणा-या पर्यटकांच्या सेवेत नेरळ-माथेरान घाटरस्ता सज्ज झाला आहे. या घाटरस्त्यातून प्रवास करताना पर्यटकांना आनंद मिळावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक कामे मार्गी लावली जात आहेत.
नेरळ-माथेरान घाट रस्त्यावरील अवघड वळणांमुळे पर्यटक आजही नेरळ नाक्यावरून माथेरानच्या दस्तुरीनाकापर्यंत जाण्यासाठी चालक घेतात. या अवघड वळणांच्या घाटरस्त्यावर समोरून येणारी वाहने दिसावीत, यासाठी कर्जत सार्वजनिक विभागाने दरीच्या बाजूला बांधलेल्या संरक्षक भिंती आणि त्यावरील कठडयांना लाल आणि पांढरे अशा निशाणीचे पट्टे मारून सूचना देण्यासाठी रंगरंगोटी केली आहे. त्याच वेळी रस्ता सुरक्षित असावा म्हणून वाहनांची वेगमर्यादा किती असावी, कोणत्या चढावावर कोणता गीअर टाकून गाडी चालवावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येणार आहेत.
पुढील दोन महिने पर्यटक वाहने आणि प्रवासी वाहनांतून येणा-या पर्यटकांचा नेरळ-माथेरान घाट मार्गावरील प्रवास सुखरूप होण्यासाठी ही सर्व कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. एस. चव्हाण यांनी दिली.