माथेरान-नेरळ घाटरस्त्यावरील खड्डय़ांमुळे येथील टॅक्सी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा देताच, सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे.
नेरळ – माथेरान-नेरळ घाटरस्त्यावरील खड्डय़ांमुळे येथील टॅक्सी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा देताच, सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र वर्षभरात हा रस्ता खराबच झाला कसा, असा प्रश्न विचारतानाच, संबंधित रस्त्याची कंत्राटदाराकडून दुरुस्ती करून घेणार का, असा प्रश्नही या संघटनेने केला आहे.
नेरळ-माथेरान घाट रस्ता चांगला असावा, यासाठी राज्य सरकारचा कायम प्रयत्न राहिला आहे. आता हा रस्ता तयार करण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण प्रयत्नशील आहे. वर्षभरापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने १ कोटी खर्च करून तयार केला होता. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट झाले होते. टॅक्सीचालकांना या खड्डय़ांचा सर्वाधिक त्रास होत होता. परिणामी संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनटक्के यांना निवेदन देऊन आंदोलन देण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन बांधकाम विभागाने माथेरान दस्तुरी नाका येथून खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.
हे काम म्हणजे केवळ मलमपट्टी असल्याचे दिसत आहे. केवळ मोठे खड्डे कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र ज्या कंत्राटदाराने रस्ता बनवला, त्याची देखभाल मुदत असताना फक्त खड्डे भरून प्रश्न सुटणार आहे का, कंत्राटदाराने त्या वेळी कोटय़वधी रुपयांचे काम केले, ते काम वर्षभरात मातीमोल होणार असेल तर सरकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना असेच मोकाट ठेवणार का, त्यांच्यावर कारवाई न करता घाटरस्ता दुरुस्त करताना केवळ मलमपट्टी करणार असेल तर आम्ही वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असल्याचा इशारा नेरळ तेथील सामाजिक कार्यकत्रे संजय अभंगे यांनी दिला आहे.