नवीन वर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानची वाट धरल्याने येथील गजबज वाढली आहे.
माथेरान – नवीन वर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानची वाट धरल्याने येथील गजबज वाढली आहे. या पर्यटकांच्या खिदमतीत येथील हॉटेल्स, कॉटेज, बंगले, बाजारपेठाही सज्ज झाल्याने माथेरानमध्ये नवचैतन्य जाणवत आहे.
माथेरानमधील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक येथे येत असतात. या वर्षी नाताळपासूनच पर्यटक माथेरानमध्ये येण्यास सुरुवात झाली होती. पर्यटकांची वाढती संख्या आणि त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपालिकाही दक्ष आहे. येथील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्य बाजारपेठेपासून प्रेक्षणीय स्थळांकडे जाणा-या रस्त्यांची माहिती पर्यटकांना व्हावी यासाठी रस्त्यारस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांसाठी बसण्याची सुविधा करतानाच, रस्त्यांवरील पथदिवे रात्रभर पेटते राहतील, याचीही काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान, पर्यटकांच्या सेवेत असणा-या हॉटेल्सना पाण्याची कमतरता भासणार नाही, यासाठी ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’ जातीने लक्ष ठेवून आहे. माथेरान नगरपालिकादेखील स्वच्छतेच्या बाबतीत काळजी वाहत आहे. वर्षअखेर माथेरानमध्ये यंदा १७ ते २० हजार पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील सर्व हॉटेल्सनी सर्व ती तयारी केली आहे. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी त्या त्या हॉटेलांत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विविध वस्तूंनी बाजारपेठाही सजल्याने सर्वत्र नवीन वर्षाचे चैतन्य जाणवत आहे.