माथेरानमधील सर्व वास्तूंची व जागेची मोजणी सरकारच्या चार विभागांकडून सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण होत आहे.
माथेरान – माथेरानमधील सर्व वास्तूंची व जागेची मोजणी सरकारच्या चार विभागांकडून सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण होत आहे. मंजूर चटईक्षेत्रापेक्षा वाढीव बांधकामांचीही माहिती घेतली जाणार आहे. उपविभागीय अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती यासंदर्भातील अहवाल ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करणार आहे. त्यानंतर ही वाढीव बांधकामे हटवली जाणार आहेत.
या परिसरात ५१३ भूखंड आहेत. त्यातील अनेक खासगी आणि सरकारी भूखंडांवर अतिक्रमणे झाली आहेत का, याबाबत माहिती घेतली जाणार आहे. भूमिअभिलेख विभागाने त्यासाठी मालमत्ता कार्ड, नकाशे, अन्य माहिती संबंधित विभागांना पुरवली आहे. उपविभागीय सुदाम परदेशी या समितीचे अध्यक्ष आहेत. तर सदस्य म्हणून पालिका मुख्याधिकारी सुदाम धुपे आणि कर्जतचे भूमिअभिलेख उपअधीक्षक नितीन तावरे तसेच उज्ज्वला भगत आदी काम करत आहेत. महसूल, भूमिअभिलेख, नगरपालिका या विभागांतील ४० कर्मचारी, अधिकारी यांच्या १० टीम माहिती घेत आहेत.
जागेचा करार संपला आहे किंवा नाही, करार वाढ आहे का, जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केलेल्या योजनेनुसार काम केले गेले आहे का, वाढीव बांधकाम किती आहे, सरकारी जमिनींवर अतिक्रमण झाले आहे का, आदी माहिती समिती तपासणार आहे. सिटी सव्र्हेचा प्लॉट अतिक्रमण मुक्त आणि वाढीव चटईक्षेत्रविना असावा, या उद्देशाने हे सर्वेक्षण केले जात आहे. माहिती घेतल्यावर त्याबाबतचा अहवाल समिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करणार आहे. या तपासणीत एखाद्याने वाढीव, बेकायदा बांधकाम केले असल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून ही बांधकामेही तोडण्यात येणार आहेत.