निर्सगसंपन्न माथेरानमध्ये पर्यटनासाठी यापुढे ४० ऐवजी ५० रुपयांची फोडणी पर्यटकांच्या खिशाला बसणार आहे.
माथेरान- निर्सगसंपन्न माथेरानमध्ये पर्यटनासाठी यापुढे ४० ऐवजी ५० रुपयांची फोडणी पर्यटकांच्या खिशाला बसणार आहे. पर्यटकांकडून नगरपालिका प्रवासी कर वसूल करत असली तरी मागील तीन महिन्यांपासून वसुलीचे कंत्राट देण्यावरून गोंधळ सुरू होता. त्यावर अखेर पडदा पडला असून खलाटकर कंपनीला हे कंत्राट कायम ठेवण्यात आले.
मागील थकित वसुलीनंतर आता नव्याने कंत्राट निश्चित करताना तब्बल ३० लाख रुपये कंत्राटदार कंपनीला जादा रक्कम म्हणून नगरपालिकेला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे प्रवासीकराची रक्कम वाढवण्यात आली.
माथेरानमध्ये प्रवासी कर वसुलीवरून मागील दोन महिने गोंधळ सुरू होता. थकित रकमेचा आकडाही ४० लाखांवर गेला होता. माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आणि नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी हा विषय सातत्याने लावून धरला होता. नगरपालिका सदस्यांनी मागील थकित रक्कम वसुली करून मे महिन्यापासून नवीन ठेका देण्याबाबत पुढाकार घेतल्याने या वादावर पडदा पडला आहे.
मागील वर्षातील प्रवासी कर वसुलीची रक्कम तब्बल पावणेतीन कोटीपर्यंत होती. यंदा मे महिन्यापासून हे कंत्राट देताना आगाऊ ३० लाख रुपये कंत्राटदार कंपनीला महापालिकेला भरावे लागणार आहेत. मे २०१४ पासून एप्रिल २०१५ पर्यंत खलाटकर कंपनी प्रवासी कर वसुली करणार आहे. संपूर्ण वर्षाची प्रवासी कराची रक्कम तीन कोटींच्या पुढे जाते. ही रक्कम कंत्राटदार कंपनीला वर्षातील ५४ हप्त्यांत पालिकेला द्यावी लागणार आहे.
ही रक्कम भरताना कंत्राटदार कंपनीकडून बेपर्वाई दाखवल्यास पालिकेचे दैनंदिन व्यवहार कोलमडण्याची भीती असते. त्यामुळे पालिकेने संबंधित कंत्राटदाराकडून बँक गॅरंटीपोटी ५३ लाख रुपये घेतले आहेत. गतवर्षी ही रक्कम ४० लाख इतकी होती. मागील काही दिवस प्रवासीकर वसूल करणारा कंत्राटदार आणि पालिकेतील काही सदस्यांत वाद निर्माण झाला होता. नगराध्यक्ष अजय सावंत यांनी समन्वयाची भूमिका पार पाडल्याने हा वाद मिटला.
बच्चे कंपनीसाठी २५ रुपये
या सर्व घडामोडीत माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवासी कर ४० वरून ५० रुपये झाला आहे. पालिकेने हा कर वसुलीचा ठेका तीन वर्षासाठी देताना दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यंदा मोठयांसाठी ५० तर लहानासाठी २५ रुपये प्रवासी कर झाला आहे.